शरदाचे चांदणे मधुबनी फुलला निशिगंध…!

लखलखत्या चांदण्याची चंदेरी चादर आज पृथ्वीने अंगभर पांघरलीय जणू काही तिला आता बोच-या थंडीची चाहूल लागलीय त्यावेळी चांदण्यांना श्वासात माळून हृदयाच्या प्रेमलाटावर श्वासांचे गीत फुलतांना…चंद्राच्या मोहक रुपावर चांदण्याही भाळतात,लिंबोणीच्या झाडाआड लपलेला चंद्र नभांगणात चांदण शिंपत चंद्रोत्सवसाजरा करतो.यावेळी रुणझुणत्या पावसाला धुंद सरीबरोबर परतीचे वेध लागतात.त्यामूळे स्वच्छ निरभ्र आकाश चंद्राच्या शितल प्रकाशात न्हाऊन निघत.पावसाळ्यातला तो कुंदपणा नकोसा वाटतांना शरदऋतूच अलवार आगमन होत..

.त्यावेळी अंगणातला प्राजक्त बहरुन येतो.सोनटक्का,शेवंती,जाई ,जुईचा मदहोश करणारा गंध अक्षरक्षा वेडावतो.शुभ्ररंगात डवरलेल्या फांदीवर क्षणभर चांदणच पडल की काय असा भास होतो.रात्रीच्या निरव शांततेत अंगअंग शहारवणारा गुलाबी गारवा त्यात लख्ख चांदण नेत्रसूख प्रदान करत विरही मनाला अस्वस्थ करत.तर सख्या साजणाचा हात हातात घेऊन नव्या स्वप्नांचा चांदण झुलाझुलतांना मन सुखात चिंब भिजत.ही चांदण रात हळव्या मनाला गोंजारते तर प्रेमीकांच्या मनात नवंप्रीतीचे संकेत रुजवत त्यांना एकमेकांत गुंतवते.तर कविमनातल्या संवेदना जागृत करुन त्यांच्या प्रतिभेला उधाण आणतो,आणि रसिक मनातील आस्वादक वृत्तीला गोंजारतो.गायकाच्या सुरेल गळ्याला चांदणस्पर्शी गोडवा बहाल करणार चांदणच!या मंतरलेल्या क्षणाची जादू तनामनावर चढते…म्हणूनच त्याच्या नशिल्या डोळ्यातील चंद्र तिच्या हृदयाची तार छेडतो.त्या वेळी मोहरलेल्या क्षणांचे मस्त गाणे होते.श्वासाशी श्वास भिडतांना गंधावलेली मने जुळतांना या रूपेरी चांदण्यात जीवनगाणे नवे रुप घेऊन जन्माला येते.या क्षणांत मनाला प्रेमाचे नवे संकेत मीळतात बावरलेले प्रीत पाखर चांदण अंगभर पांघरतांना स्पर्शाचा पारिजात धुंदपणे बहरतो.त्यावेळी अधिरल्या ओठावर या ओळी अलगद येतात-

“पान जागे,फूल जागे,भाव नयनी जागला”
“चंद्र आहे साक्षीला…चंद्र आहे साक्षीला”

शरदाच चांदण म्हटल की डोळ्यासमोर येते ती कोजागीरी पोर्णिमा…त्या धुंद नयनरम्य चंद्रप्रकाशात कोजागीरीचे दूध आटवत रात्रभर जागरण करायचे,ही प्रथा फार जूनी आहे त्याचा शास्त्रीयदृष्ट्या आपल्या आरोग्याशी जवळचा सबंध आहे.शरदातल्या चांदण्यांना अनोखा गंध असतो,चांदण्यात न्हाऊन निघालेल्या चंद्राला प्रसन्न चमक लगडलेली असते.त्या चांदण्यांच्या झिरमिरत्या थेबांनी मन कधीच चांदण बनून जात.झाडापानावर नवतेची झळाळी झुलू लागते अन फुलांच्या ओठावर हास्याच्या पाकळ्या मनसोक्त खेळू लागतात,असा हा चंद्रोत्सव सहस्त्र ता-यांच्या मांडवाखाली साजरा करण्यासाठी मन खूप अधिर असत.या फुललेल्या पुनवेचे बिंब हृदयात साठवतांना स्वप्नफुलांची चांदपालखी प्रत्येकाच्या डोळ्यात सजते.अंग अंग पुलकीत करणारा खट्याळ रानवारा,चांदण लेवून सजलेल्या वृक्ष लता दाट हिरव्या झाडीतून जाणारी चांदण पायवाट,निशिगंधाने बेभाणपणे फुललेलं मधुबन,त्या प्रणयी सुगंधात न्हाऊन तल्लीनतेने पावा वाजवणारा राधेचा गोविंद…देहभान विसरुन हरिभोवती नाचणा-या गोपी…यमुनातटावर रंगलेली गोप-गोपीकेची रासक्रीडा क्षणभर डोळ्यासमोर ऊभी राहाते…

“शरदाचे चांदणे मधुबनी फुलला निशिगंध”
नाचते गोपी जनवृंद,वाजवी पावा गोविंद”

रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *