निळे समुद्र,निळे आकाश,
निळ निळाईवर चढला चंदेरी साज…
कृष्णकमलावर दडले नितळ निळ्या
दवांचे गुपीत आज…
पृथ्वी,समुद्र,आकाश असं आपलं अख्ख अस्तित्वच निळाईनेच सुरू होते मग रंगाचे भेद का? रंगाचं वेड नक्की सर्वांचं असेल…पण मला आकर्षक करते ते निळाई
मग ते निळे आकाश असो, निळा सागर असो, निळ्या डोळ्यांचा राज कपूर असो, इंडियन टिम चा ड्रेस असो, फेसबुक सारखे एखादे फिचर्स असो किंवा पेनीतील निळी शाई असो…
मी लहान असताना आई निळच्या निळाईत शुभ्र कपडे भिजवून वाळत टाकायची…हा निळा रंग माझं सगळं आयुष्य व्यापून आहे हे मात्र खरं !
ग्रेसना पण निळाईचे आकर्षण होते. या ‘निळाई’च्या आकर्षणातुन अगदी पिकासोसुद्धा सुटलेला नाहीये.
कुठल्याही उंच ठिकाणावर गेलात तर नजर जाईल तिकडे पसरलेली निळी चादर पाहताना वेड लागल्यासारखे होते.
वेड लागण्यावरून आठवले ‘प्राण्यांची भाषा जाणण्याची जी कला असते तिला…. निळावंती असे म्हणतात आणि ही कला जर नीट जमली नाही, व्यवस्थीत वापरली नाही तर वेड लागते असे एक मिथक आहे. निळावंतीशी कधी संबंध नाही आला माझा पण ही आसमंताची ‘निळाई’ मला कायमच वेड लावत आलेली आहे.
आकाशातील लाल,केशरी झालरी खालून संध्येची चाहूल लागायला सुरूवात झाली की, नभांगणाला निळाईचा पान्हा फुटतो. समुद्राच्या पुढे उभे राहिले की समोरच निळाशार ! पसरलेला अथांग समुद्र दिसतो आणि वर आकाशाकडे पाहिले की पांढुरक्या तपकिरी रंगाला हलकेच व्यापत चाललेली निळाई समोर येते. कधी कधी तर नभांगणातल्या श्वेत ढगांची हळुहळु निळाईनी आसमंत व्यापत चाललेल्या स्वतःच्या अस्तित्व राखण्याची शेवटची केविलवाणी धडपड चालु राहते.
तर कधी अचानक पुन्हा त्या श्वेतरंगाने आक्रमणाचा विडा घेतला असावा असे वाटते. क्षितीजाच्या एका कडेपासून हळुवारपणे निळाई ची एक रेघ आसमंतात उमटायला सुरूवात होते तेव्हा
विलक्षण रंगाची जुगलबंदी पाहताना मात्र संमोहनाचा भास होता. क्षितीजाच्या या टोकापासून निघालेल्या त्या निळाई रेघेचे रुपांतर आपल्याला मनमोहक करण्यासाठी श्वेतरंगाने दुसर्या टोकाकडूनही हालचाल करते. भान हरपून त्या वेड लावणार्या द्श्याकडे पाहात राहणे एवढेच सद्ध्या आपल्या हातात उरलेले असते.
नीलकमल,नीलकुहर,नीलगाभा,नीलगुंफा, नीलकंठ,नीलकुमार,
या अश्या श्यामल निळ निळाईत हरवताना मला जाणवले की नकळत मी देखील या निळाईचा एक पदर पांघरून घेतला आहे.
उबदार कुशीत निजली पहाट
निळ निळाई भाबडी पहाट
पान,फुलांवरून ओघळली पहाट
आशेच्या किरणांनी लुकलुकली पहाट
रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211