बचतगटांची चळवळ म्हणजे भांडवलशाही विरोधातील आर्थिक संघर्ष! ;सुप्रसिद्ध विचारवंत बालाजी थोटवे यांचे प्रतिपादन; बचत गटांची कार्यपद्धती या विषयावर कार्यशाळा 

नांदेड – सर्वसामान्य वर्गातून बचतगट हे जातभांडवल म्हणूनच पुढे येतात. मात्र खऱ्या अर्थाने या बचत गटांचा संघर्ष देशातील मोठमोठ्या वित्तीय संस्थांशी असतो. या वर्गातील सामाजिक,  सांस्कृतिक तसेच शैक्षणिक प्रश्न त्यांनी चालवलेल्या या अर्थचळवळीशी निगडित असतात. सार्वजनिक स्तरावर एक भक्कम अर्थसंस्था म्हणून उदयाला येणे दुरापास्त असते. वित्तभांडवल हे बचत गटांचे उद्दिष्ट असले पाहिजे. बचतगटांची ही चळवळ म्हणजे भांडवलशाही विरोधातील आर्थिक संघर्ष होय असे प्रतिपादन येथील सुप्रसिध्द विचारवंत तथा लसाकमचे प्रदेशाध्यक्ष बालाजी थोटवे यांनी केले.
यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून शैक्षणिक व आर्थिक चळवळीचे अभ्यासक डॉ. हेमंत कार्ले, विविध बचत गटांच्या संचालिका संगिता कार्ले यांची तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे यांची उपस्थिती होती.
येथील संचित पुरुष व स्वप्नपूर्ती महिला बचतगटांच्या वतीने वर्षपूर्ती सभेच्या निमित्ताने बचतगटांची कार्यपद्धती या विषयावर शहरातील हाॅटेल विसावा पॅलेसच्या काॅन्फरन्स हाॅल मध्ये एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना डॉ. हेमंत कार्ले म्हणाले की, बचतगट ही एक सामाजिक व आर्थिक प्रक्रिया आहे. या माध्यमातून संघटित ताकद व पारदर्शक सहकाराची प्रक्रिया जर एकत्र आली तर विविध प्रकारची उद्योजकता निर्माण होते आणि समाजाच्या प्रगतीला हातभार लावते. या चळवळीतून अनेक प्रकारचे उद्योग जन्माला आले आहेत. बचत गटामार्फत सभासदांना दिल्या जाणाऱ्या कर्जामुळे सभासद सामाजिक व आर्थिक विकासात परिणाम होऊन सक्षमता निर्माण होते. त्यासाठी बचतगटांच्या उपक्रमास उद्योजकतेची जोड असावी असे मत डॉ. कार्ले यांनी व्यक्त केले. यावेळी संगिता कार्ले आणि अनुरत्न वाघमारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 
           
        कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व सभासदांचे व प्रमुख पाहुण्यांचे परिचय सत्रात स्वागत करण्यात आले.‌ त्यानंतर दोन्ही बचतगटांचा आर्थिक लेखाजोखा मांडण्यात आला. तसेच पांडूरंग कोकुलवार, मारोती कदम, पंचफुला वाघमारे, नागोराव डोंगरे, चंद्रकांत कदम, खिराडे आदी सभासदांनी मनोगत व्यक्त केले. बचत गट यशस्वीरित्या चालविल्याबद्दल पुरुष बचत गटाचे अध्यक्ष शंकर गच्चे व सचिव मारोती कदम तसेच महिला बचत गटाच्या अध्यक्षा मनीषा गच्चे व सचिव पंचफुला वाघमारे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभेचे प्रास्ताविक शंकर गच्चे यांनी केले. सूत्रसंचालन प्रज्ञाधर ढवळे यांनी केले तर आभार बाबुराव पाईकराव यांनी केले. या सभेस दोन्ही बचतगटांच्या सभासदांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यावेळी सभासदांना लाभांशाचे वाटप करण्यात आले. सुरुची भोजनानंतर कार्यशाळेची सांगता करण्यात आली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *