कंधार (प्रतिनिधी संतोष कांबळे)
डॉ.गंगाधर तोगरे हे समाजाच्या उत्थानासाठी, उद्धारासाठी, परिवर्तनासाठी आणि प्रबोधनासाठी गेली अनेक वर्ष शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात अत्यंत निष्ठापूर्वक काम करत, विद्यार्थी हे दैवत माझे हा माझा विश्वास असे..या न्यायाने काम करत ते आज वयाची बासष्ट वर्षे पूर्ण करत आहेत. सरांच्या बासष्टाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा हा विशेष लेख.
कुटुंबात आई-वडीलांचे सुयोग्य संस्कार, दारिद्रयाचे बसलेले चटके, विद्यार्थी दशेत शिक्षक आणि प्राध्यापकांनी केलेले उत्तम संस्काराची पेरणी आणि योग्य मार्गदर्शन, शिक्षणतज्ज्ञ डॉ.ना.य. डोळे सरांचा लाभलेला सहवास या सर्वाच्या गोळाबेरजेतून डॉ. गंगाधर तोगरे नावाच्या प्रज्ञा आणि प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वाच्या जीवनाला नवा आकार मिळाला आणि संघर्षमय प्रवासाने सामान्य माणसाबद्दल आदरभाव व समाजाविषयी कणव निर्माण झाली. असे सामाजिक जान आणि भान असणारे व्यक्तीमत्व म्हणून डॉ.गंगाधर तोगरे यांची ओळख वृद्धिंगत होत गेली.
मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. व्यक्तीने केलेल्या दर्जेदार कार्यावर समाजाची प्रगती प्रतिबिंबीत होत असते. कर्तबगार व्यक्ती समाजाला मार्गदर्शक, दिशादर्शक व प्रेरणादायी ठरत असते. कर्तबगार व निष्ठापूर्वक धडपडणाऱ्या व्यक्तीचा समाज उन्नतीसाठी उपयोग होतो. त्यामुळे आपसूकच समाजाला अशा व्यक्ती सदा हव्याहव्याशा वाटतात. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, शारीरिक शिक्षण, क्रीडा आदी क्षेत्रात आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे डॉ.गंगाधर तोगरे हे आहेत.
बालपणी सोसलेल्या आर्थिक हाल अपेष्टा, जगण्याचा जीवघेणा संघर्ष, गावात जि.प.शाळा उत्तम असूनही गरीबीमुळे जांब बु.ता.मुखेड येथील वसतीगृहात झालेला प्रवेश, तिथे पोटाची अन् ज्ञानार्जनाची मिळालेली संधी, भविष्याचा वेध घेण्यास पूरक ठरली. आणि महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात डॉ.ना.य.डोळे सरांशी राज्यशास्त्र विषयामुळे मिळालेला सहवास. त्यांचे विद्यार्थी कलानुसार मार्गदर्शन जीवनाला कलाटणी देणारे ठरले. महाविद्यालयातील प्राध्यापकांचे प्रत्येक विद्यार्थ्याकडे असणारे लक्ष, विद्यार्थ्यात सराविषयी असणारा आदरभाव. त्यामुळे अकरावीमध्ये शिकताना नोटस् व रफ वहीत नावापूर्वी प्राध्यापक लिहीण्याची उर्जा मिळाली. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून कर्मयोगी भाई डॉ.केशवराव धोंडगे यांच्या शिक्षण संस्थेत अधिव्याख्याता ते प्रोफेसर अशी अध्यापनाची संधी मिळाली.
भाई केशवराव धोंडगे व भाई गुरूनाथराव कुरूडे यांची उपेक्षित, वंचित आणि सामान्य, शेतकरी, कष्टकरी माणसा विषयीची असलेली कणव आणि भूमिका घेऊन विद्यार्थ्याचे आर्थिक व सामाजिक प्रश्न समजून घेऊन सरांनी मदतीचा हात पुढे केला. हे करत असताना पँथरमध्ये काम केल्याने जाती- पातीला कधी त्यांनी स्पर्श होऊ दिला नाही. त्यांचे आजही हजारो विद्यार्थी या घटनेचे साक्षीदार आहेत. गरीब विद्यार्थ्यांना वहया, शैक्षणिक साहित्य, कपडे, चप्पल आदी सोय करण्यातही डॉ. गंगाधर तोगरे कधी कमी पडले नाहीत.
डॉ.गंगाधर तोगरे सरांनी विद्यार्थी व समाजाच्या उत्थानाचा, परिवर्तनाचा आणि प्रबोधनाचा विचार सतत आपल्या जीवनात अंगीकृत करत आजपर्यंत ते समाजात वावरत आहेत. याचा आम्हाला निश्चित अभिमान वाटतो. राजर्षी शाहु महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या विचारावर प्रचंड निष्ठा ठेवून गोरगरीब विद्यार्थी केंद्र बिंदू मानून अशा उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांना त्यांनी मदतीचा हात दिला आहे.
शिक्षकांची उंची ही त्यांच्या विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी पटकावलेल्या मोठ्या पदावरून मोजमाप केली जाते. संरक्षण, पोलीस, वनविभाग, शिक्षक, प्राध्यापक पदावर तोगरे सरांचे हजारो विद्यार्थी आज कर्तव्य बजावत आहेत. विद्यापीठाच्या विविध समितीवर काम करताना प्रा.डाॅ.गंगाधर तोगरे सरांनी विद्यार्थी विकासासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी कोणते उपक्रम आणि योजना राबविल्या पाहिजेत हाच ध्यास ठेवून त्यांनी काम केले आहे.
मन्याडखोऱ्यातील भुईकोट किल्ला, जगतुंग समुद्र, लालकंधारी पशुधन, बंजारा समाजाची होळी व धुंड, श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा, बडी दर्गाह, साधु महाराज संस्थान, जागतिक गुराखी साहित्य संमेलन, कुस्ती आखाडे, मुर्तीशिल्प वैभव, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विषयाची त्यांनी केलेली हाताळणी लक्षवेधी ठरली आहे. शेतकरी व कष्टऱ्यांचे जीवनमान उंचावणे, भटक्या विमुक्तांचे प्रश्न ऐरणीवर आणण्याचे कसब, शब्द, मथळा, वाक्यात मोठी ताकद दर्शवणारी पहायला मिळाली. हे त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या क्षेत्रात दाखवून दिले.
त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना विविध संघटनेने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत अनेक पुरस्कार देऊन त्यांना गौरविले.
डॉ.तोगरे सर नारळा सारखे वरून अतिशय कठीण दिसतात. परंतु आतून ते नितळ व निर्मळ पाण्यासारखे आहेत. त्यांना वाचन, गायन, खेळाची प्रचंड आवड आहे. त्यांनी हातात घेतलेले कोणतेही काम निष्ठापूर्वक करत असतात. त्यांचे आशयपूर्वक लेखन, विविध विषयावर सतत बोलकं वृत्तांत लेखन, त्यांचा हजरजबाबीपणा व रूबाबदारपणा, टॉपटीप राहणीमान, आरोग्यदक्ष असलेले डॉ.गंगाधर तोगरे सर सेवानिवृत्त झाले. परंतु त्यांच्या निरोगी आरोग्याकडे पहाताच तरूण सुद्धा अवाक् झाल्याशिवाय राहत नाही. सरांना बासष्टाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने निरोगी आरोग्यमय शुभेच्छा.
– शिवा कांबळे हाळदेकर
(राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक)