
मुखेडात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त श्री गुरुचरित्र पारायण व अखंड नाम जप यज्ञ
मुखेड:( दादाराव आगलावे)
श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) केंद्र मुखेड येथे गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे व चंद्रकांत दादा यांच्या आदेशाने अखंड स्वामीनाम जप यज्ञ सप्ताह व सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळा सप्ताह दि.२० एप्रिल ते २६ एप्रिल २०२५ दरम्यान आयोजिला आहे.
या सप्ताह काळात अखंड स्वामीनाम जप, अखंड दोन विना वादन, अखंड स्वामी चरित्र, गणेश याग, मनोबोध याग, गीताई याग, चंडी याग, स्वामी याग, रुद्र याग, मल्हारी याग, तसेच रोज नित्यस्वहाकार व त्रिकाल आरतीसह सायंकाळी औदुंबर प्रदक्षिणा व विष्णुसहस्त्रनाम, गिताई, मनाचे श्लोक, पसायदान, तुकाराम अभंग आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. पुण्यतिथीच्या दिवशी महानैवेद्य व महाआरती नंतर आयोजित महाप्रसाद वाटप करण्यात येतो. पंचक्रोशीतील भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. सप्ताह दि. 20 एप्रिल रोज रविवारी सुरुवात झाले असून दि. 26 एप्रिल रोज शनिवारी सप्ताहाची सांगता होणार आहे. गुरुचरित्र पारायणला असंख्य महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले असून अतिउच्च कोटीची प्रहर सेवेमध्ये अनेकांनी सहभाग नोंदविला आहे. करोडो लोकांना प्रहर सेवेचे अप्रतिम अनुभव आले आहेत, प्रत्येकाने प्रहर सेवा करावीच पण त्यासोबत कमीत कमी ५ तरी नवी व्यक्तींना आपल्यासोबत प्रहर सेवेला नक्की घेऊन यावे असा अनुभव देखील केंद्रात सांगितला जातो.
स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त सुरू असलेल्या गुरुचरित्र पारायण व इतर सेवा शिस्तीमध्ये करून सहकार्य करावे असे श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) केंद्र मुखेडच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
गुरु चरित्र पारायण काळात पाळावयाचे नियम
श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मनाला जातो.श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भारलेला सिद्ध मंत्र रूप महप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे.श्री गुरुचरित्र वाचनासाठी बसणारे सेवेकरी यांनी शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम पाळावेत. सात दिवस ब्रम्हचर्य पालन करावे.जमिनीवर/चटई / सतरंजी वर शयन (झोप) करणे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्न घेऊ नये.आपली आई,पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस (सकाळ व संध्याकाळ) एक धान्य फराळ करावा.(चपाती, भाकरी किंवा भात या तीन्ही पैकी एकच अन्न ०७ दिवस घ्यावे). काही अटीतटीची समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही.७ दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खावु नये. सेवेकऱ्यांचे अन्न परान्न होत नाही. पारायण काळात चामड्या ऐवजी नॉयलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतः च्या कुटुंबात जर मृतशौच आले किंवा जननशौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे, अर्धवट सोडू नये. शक्यतो गाव, वेस सोडून जावु नये, अटीतटीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जावु नये. सात दिवस शुभ बोला, कोणाविषयी द्वेष ठेवु नका. तसेच आयुष्यात पुढेपण असंच राहण्याचा प्रयत्न करा. गर्भवती स्री पारायणास बसु शकते, पण शास्त्र वचन म्हणते की ७ व्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीस जास्त काळ बैठक शक्य होत नाही. त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा. ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही. कांदा, लसुण वगैरे जास्त प्रमाणात खावु नये. विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होवू शकतो. शक्यतो एसिडिटी (पित्त) वाढणार यास्तव कडधान्य (डाळ) इ. द्विदल धान्य वर्ज करावी. त्याबदल्यात दूध, पोळी, हिरवी भाजी घ्यावी. थोडक्यात आहार शास्त्र महत्वाचे बाकीच्या गोष्टी गौण आहेत. काळे वस्त्र आजपासून किमान ७ दिवस वर्जकरावे. श्री गुरुचरित्र हा ५ वा वेद आहे. यामुळेच रोज रात्री पारायण काळात अभद्र बोलले गेले, वागले गेले, शब्द उच्चार चुकीचे झालेत यास्तव क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णु सहस्त्रनाम स्तोत्र वाचन घरी करावे. या सप्ताहात अजुन पुण्य कमवायचे असेल तर दु:खी, आर्त, पिडीत, मुमुक्षीत आहेत त्यांना दुःख मुक्तीचा हा स्वामी मार्ग समजावून सांगणे. परस्त्री माते समान हे मार्गाचे वैशिष्ट्य आहे, या प्रमाणे आचरण करणे.
खऱ्या अर्थाने दुःख मुक्त व्हायचे असेल तर प्रथम स्वामी महाराजांना मनोमन गुरु मानून त्यांचा फोटो देवघरात स्थापन करणे, वास्तु व देवघर शास्त्रा प्रमाणे आहे का? हे तपासून घेणे, पितृऋण आहे का? समजून घेणे, कुलाचार कुलधर्म पालन होतय का? कुलदेवीची उपसना होते का? या गोष्टी केंद्रात समक्ष संबधीत सेवेकरी यांना भेटून तपासून घेतल्यास आयुष्यातील बऱ्याच अडचणी कमी होतात. तेव्हा परिसाचा सहवास स्वीकारून आपल्या आयुष्याचे खरे सोने करून घ्यावे असे आवाहन गुरुमाऊलींनी केले आहे.