हा सन्मान माझा एकट्याचा नसून माझे आई-वडील(कै. भीमाबाई व कै. पांडुरंगराव पुंडे),पत्नी सौ.माला पुंडे, सर्व गुरुजन, पुंडे हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी आणि सेवेची संधी देणाऱ्या हजारो रुग्णांचा आहे.
-डॉ दिलीप पुंडेमुखेड: (दादाराव आगलावे)
26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचे विशेष निमंत्रण राष्ट्रपती भवना मार्फत डॉ. दिलीप पांडुरंगराव पुंडे यांना प्राप्त झाले आहे. सदरील निमंत्रण हे ‘रिसेप्शन ॲट होम’ या कार्यक्रमाचे असून भारतामधून 11 डॉक्टरांना त्यांच्या विशेष कार्याबद्दल सन्मानाने निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात मुखेड (नांदेड) या ग्रामीण भागात मागील 38 वर्षांपासूनच्या सर्पदंशावरील विशेष कार्याची दखल घेत भारताच्या राष्ट्रपती महामहीम व राष्ट्रपती भवनामार्फत हे निमंत्रण डॉ. दिलीप पांडुरंगराव पुंडे यांना देण्यात आले आहे.
नांदेड येथील मुख्य पोस्टातील वरिष्ठ अधिकारी श्री अरुण गायकवाड व त्यांची विशेष टिम व मुखेड पोस्टातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतः येऊन सन्मानाने हे निमंत्रण डॉ. दिलीप पुंडे व सौ. माला पुंडे यांना दिले . सदरील कार्यक्रम 26 जानेवारी रोज सोमवारी सायंकाळी चार वाजता राष्ट्रपती भवनात होणार आहे.
मागील 38 वर्षांपासून डॉ. दिलीप पुंडे हे सेवावॄतीने या भागात आरोग्य सेवा देत आहेत. 1988 ते 1997 या काळात ग्रामीण रुग्णालय मुखेड येथे त्यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्य केले. 1997 पासून पुंडे हॉस्पिटल मुखेड (नांदेड) येथे ते कार्यरत आहेत. आज पर्यंत लाखो रुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत. सर्पदंशाच्या दहा हजारांहून अधिक रुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत. 1988 साली या भागात सर्पदंशाचा मृत्यूदर अंदाजे 25 टक्के होता. 2024-25 पर्यंत हा मृत्यू दर शुन्य टक्क्यांवर आणण्यात ते यशस्वी झाले आहेत. 2015 साली भारतातर्फे ‘ऑक्सफर्ड विद्यापीठात’ सर्पदंशाविरुद्ध युद्ध या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. आजपर्यंत त्यांनी पाच लाख लोकांचे सर्पदंशाविषयी मोफत जनजागरण केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकांमध्ये त्यांचे 10 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदांमध्ये सर्पदंशावर त्यांची व्याख्याने झाली आहेत.
राष्ट्रीय सर्पदंश मार्गदर्शन समितीचे ते सदस्य आहेत. 2021 पासून जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यू.एच.ओ.) सर्पदंश तज्ञसमितीचे ते सदस्य आहेत. राष्ट्रीय सर्पदंश कृती आराखडा समितीचेही ते सदस्य आहेत. पुंडे हॉस्पिटल हे सध्या आयसीएमआर (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे) केंद्र आहे. मुखेड येथे पत्रकार परिषदेत डॉ. दिलीप पुंडे बोलताना म्हणाले की, हा सन्मान माझा एकट्याचा नसून माझे दिवंगत आई-वडील, सर्व गुरुजन, पत्नी सौ. माला पुंडे, पुंडे हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी आणि मला सेवेची संधी देणारे हजारो रुग्ण यांचा आहे. सर्पदंश हा शेतकरी व शेतमजूर यांचा काल मर्यादित अपघात असून वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यू संभवतो. भारतात दरवर्षी किमान एक लाखाच्यावर मृत्यू सर्पदंशामुळे होतात. 2030 पर्यंत सर्पदंशाचा मृत्यूदर 50%कमी करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने सध्या देशात सर्पदंशाविषयी अनेक उपक्रम कार्यान्वित केले आहेत . शेतकरी, शेतमजूर व सर्पदंश रुग्णांच्या वेदनेची संवेदना राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचली याचा मला विशेष आनंद आहे. मी भारताच्या महामहीम राष्ट्रपती, राष्ट्रपती भवन, महासंचालक आरोग्य सेवा भारत व भारतीय डाक सेवा विभाग यांचा ऋणी आहे. मुखेड भूषण डाॅ. दिलीप पुंडे यांच्या या सन्मानाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

