कंधार : (दिगांबर वाघमारे )
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी केवळ पाठ्यपुस्तकांपुरते शिक्षण न देता व्यवहारिक ज्ञान देणे तितकेच आवश्यक असल्याच्या उद्देशाने श्रीमती गंगाबाई बालक मंदिर व प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त दिनांक २२ जानेवारी रोजी ‘आनंदनगरी’ हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.या आनंदनगरीचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक महंमद अन्सारोद्दीन यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध दुकानांची मांडणी करून खरेदी-विक्री, व्यवहार, नियोजन व संघभावना यांचे प्रत्यक्ष अनुभव घेतले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपक्रमास पालक व उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.
यावेळी मंजुषा केंद्रे, सविता शेंडगे, संतोष कांबळे, सुनील राठोड, प्रवीण मंगनाळे, माधव गोटमवाड आदी शिक्षकवृंद तसेच स्वप्नभूमीनगर येथील पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी या उपक्रमाचा आनंद घेत प्रजासत्ताक दिनाचा उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला.
‘आनंदनगरी’सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, व्यवहारज्ञान व सृजनशीलतेचा विकास होतो, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.


