कंधार (प्रतिनिधी)
संत गाडगेबाबा शिक्षण संस्था, कंधार संचलित संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय, सोमठाणा येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिन उत्साहात साजरा केला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी एक दिवसासाठी शाळेचे संपूर्ण कामकाज यशस्वीरीत्या सांभाळले. हा कार्यक्रम दिनांक २२ जानेवारी रोजी पार पडला.
स्वयंशासन दिन कार्यक्रमाची सुरुवात स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक श्री आनंद केरबा रेडे व शाळेचे मुख्याध्यापक श्री नागरगोजे सर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून करण्यात आली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव, शिस्त व प्रशासनाची प्रत्यक्ष माहिती मिळाली. विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या भूमिका समर्थपणे पार पाडत शाळेचे कामकाज सुरळीतपणे चालविले.या कार्यक्रमास स्वयंशासन दिनातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळेतील सर्व कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वयंशासन दिनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून शैक्षणिक व सामाजिक विकासास चालना मिळाली, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

