देशभक्तीने ओतप्रोत असा सुंदर चित्रपट ज्याचे नाव :१९७१

दरवर्षी बॉलिवूडमध्ये शेकडो चित्रपट वेगवेगळ्या विषयांवर तयार होत असतात. त्यातील काही चालतात आणि काही तर लोकांना कधी आले कधी गेले हे ही माहीत होत नाहीत. भारतीय प्रेक्षकांची सिनेमाकडे बघायची दृष्टी काळानुसार खुप बदलते. जुन्या काळी सिनेमाच्या कथानकाला जास्त महत्व नव्हतं पण नुसत्या संगीतावर चित्रपट सिल्व्हर जुबाली व्हायचे. आताही चांगली श्रवणीय गाणी चित्रपटाला तारून नेतात पण नवीन पिढीला गाण्यासोबत चांगली कथा लागते तरच चित्रपट हिट होतो.

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या चित्रपटांची संख्या त्या मानाने फारच नगण्य आहे. जर आज पर्यंतचा चित्रपट इतिहास बघितला तर अस लक्षात येईल की फार मोजके चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर शोले च देता येईल. हा चित्रपट अनेक पिढ्या लोक अक्षरशः जगले. आताची नवी पिढी सुद्धा एव्हढ्या जुन्या काळातील कथानक मोठ्या आवडीने बघते. जर आपण त्याच्याही मागे गेलं तर ऐतिहासिक विषयावरचा मुगल-ए-आझम हा सिनेमा किंवा राज कपुरचा सामान्य माणसाच्या जीवनावरील श्री 420, प्रेम कथा असलेला बॉबी, हे सिनेमा सुद्धा लोकांनी गाजवले.
तसेच मैने प्यार किया, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, सत्या, बाहुबली यासारखे श्रेष्ठ चित्रपट रसिक कधीच विसरू शकणार नाही.

असाच अफलातुन विषयावर आधारित एक चित्रपट मध्यंतरी 2007 साली येऊन गेला. हा चित्रपट आणि याचे कथानक एव्हढा भारी असूनही हा कधी आला आणि कधी गेला हे लोकांना कळलं पण नाही. याची काय कारण असतील, की निर्माते आणि दिग्दर्शक जाहिरातीत कमी पडले माहीत नाही. पण हे मात्र नक्कीच की हा चित्रपट अफलातून होता. आजकाल भारतीय राजकारण आणि सिनेमा ह्याच समीकरण फार जवळच झालं आहे. एखाद्या दिग्दर्शकाने जर सरकारच्या चुकांवर बोट ठेवत किंवा त्यांच्या पॉलिसीच्या विरुद्ध दिशेने जात एखादा विषय मांडला की लागलीच त्याच्या प्रदर्शनात ही लोक आडकाठी आणतात. जर प्रदर्शित झालाच तर त्याला स्क्रीन मिळू न देणे, आपल्या कार्यकर्त्यांद्वारा सिनेमागृहावर हल्ले करणं, पोस्टर फाडणे, मोर्चे काढणे, धमक्या देणे हे चित्र आता नेहमीचंच झाला आहे.
मी ज्या बद्दल बोलतोय तो सर्वदृष्टीने उत्कृष्ट असलेल्या
चित्रपटाचं नाव 1971. हो बरोबर वाचलं तुम्ही चित्रपटाचे नाव 1971 हेच आहे. दिग्दर्शक अमृत सागर व लेखक पियुष मिश्रा. ही तिन्ही नावे प्रेक्षकांना खर तर जास्त परिचित नाहीत. 1971 म्हटलं की नवीन पिढीला जास्त काही बोध होत नाही आणि लेखक आणि दिग्दर्शक फारच अनोळखी. त्यामुळे ही या चित्रपटाच्या कामगिरीवर परिणाम जरूर झाला असेल. पण ही कलाकृती असाधारण अशी होती. प्रत्येक भारतीयाने पहावा असा हा चित्रपट होता. १९७१ या चित्रपटात मनोज बाजपेयी, मानव कौल, रवीकिशन, स्वतः लेखक पियुष मिश्रा यांच्यासह सर्वच कलाकारांनी अप्रतिम काम केलेले आहे. चिरंतन दास यांनी केलेले छायाचित्रीकरण लाजवाब असे आहे. विशेष म्हणजे ५५व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ह्या चित्रपटाला हिंदीमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. तरी सुध्दा सर्वसामान्य प्रेक्षकाला हा चित्रपट पाहताच आला नाही. माझ्यासहित अनेक चित्रपट वेड्यांनी तर १९७१ या चित्रपटाचे नाव सुध्दा यापूर्वी ऐकलेले नव्हते.

हकिकत’,बॉर्डर’, ‘उरी’, ‘राजी’, ‘लक्ष’ ‘एल.ओ.सी.-कारगिल’ हे युध्दाशी संबंधित चित्रपट रसिकांना आवडलेले आहेत. त्याच पठडीतला किंबहुना त्यांच्यापेक्षा थोडा सरस असा १९७१ हा चित्रपट आहे. सत्यघटनेवर आधारित या चित्रपटात प्रत्यक्ष युद्धाचे वातावरण नसले तरीही पार्श्वभूमी युद्धाची आहे. कारण बांगलादेशच्या निर्मितीसोबत १९७१ मध्ये ते युद्ध संपले व हा चित्रपट जिथून सुरु होतो ते वर्ष दाखवलेय १९७७. भारत –पाकिस्तान युध्द संपल्यानंतर घडलेला पण जगापासून लपवलेला हा काळा इतिहास आहे. भारत-पाक सीमारेषेपासून फक्त २०० किमी अंतरावर घडत असलेले हे कथानक चित्रपटाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवते.
कथेची मांडणी इतकी जबरदस्त झालेली आहे की, प्रत्येक जण श्वास रोखून हा चित्रपट पाहतो. ज्यांनी ज्यांनी हा चित्रपट पाहिला ते या चित्रपटात एवढे भावनात्मकरित्या गुंतून जातात की चित्रपटातील व्यक्तिरेखा काही दिवस तरी त्यांच्या डोळ्यां समोरुन जातच नाहीत.
हे सर्व वाचून तुम्हाला असा प्रश्न पडणे सहाजिकच आहे की इतका सुंदर चित्रपट असला तर त्यावेळी याची चर्चा का झाली नाही. मला सुद्धा हा प्रश्न पडला. आणि मग मी या चित्रपटाचा इतिहास शोधून काढला. गुगलवर माहिती मिळाली की, चित्रपटाची विशेष दखल न घेतल्यामुळे ( याची कारणे जरा वेगळी आहेत आणि चित्रपट पाहताना ते प्रेक्षकांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही ) जीव ओतून काम केलेल्या मनोज बाजपेयीला अतिशय वाईट वाटत होते. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळून देखील सामान्य चित्रपट रसिकांकडून न्याय मिळाला नाही अशी त्याची ठाम समजूत झाली होती. लॉकडाऊन च्या काळात मनोज वाजपेयीच्या एका मित्राने चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केली . मनोजच्या आग्रहावरून चित्रपट निर्मात्यांनी लिंक त्या मित्राकडे पाठवली. मित्राने तो चित्रपट पाहिला आणि त्याला तो इतका आवडला की त्याने त्याबाबत सोशल मीडियावर कॉमेंट्स टाकली. ती वाचून अनेकांनी चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे निर्माते सागर यांनी या चित्रपटाची मोफत लिंक युट्युब वर टाकली. लॉकडाऊनच्या काळात लोक घरी होते, हाताशी भरपूर वेळ होता. नेमकं तेव्हाच यु-ट्युबवर हा सत्यघटनेवर आधारित दर्जेदार चित्रपट विनामूल्य पाहण्याची संधी सागर पिक्चर्स यांनी दिली.
केवळ गेल्या ३ महिन्यात दोन कोटी चाळीस लाख लोकांनी हा चित्रपट पाहिला आहे. तो अनेकांना भावला. युट्युब वर या चित्रपटाच्या कॉमेंट्स वाचल्या तरीदेखील चित्रपटाच्या दर्जाची खात्री पटते.

चित्रपटाची कथा सांगून वाचकांचा रसभंग करण्याची माझी इच्छा नाही. परंतु चित्रपटात दाखवलेल्या
भारतीय गुमशुदा सैनिकांचे नेमके झाले तरी काय याचा पडद्यामागील घडामोडीचा आढावा घेणे हा लेख लिहिण्यामागचा उद्देश आहे. १९४७ आणि १९६५ मध्ये काश्मीरमधील वादग्रस्त प्रदेशात भारत आणि पाकिस्तान दोनदा युद्धाला भिडले होते. त्यानंतर १९७१ मध्ये बांगलादेश निर्मितीच्या युद्धात भारताचे ५४ सैनिक हरवलेले होते. हे सर्व सैनिक पाकिस्तानी तुरुंगात आहेत, असा भारताचा विश्वास आहे. परंतु ते गायब झाल्यानंतर चार दशकांहून अधिक काळ, त्यांची संख्या आणि ठावठिकाणा याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण नाही.
गेल्या जुलैमध्ये मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने संसदेला सांगितले होते की पाकिस्तानच्या ताब्यात हे ५४ बेपत्ता असलेले भारतीय सैनिक होते. याव्यतिरिक्त काही सैनिक आहेत जे “सीमा ओलांडलेले” किंवा हेरगिरीच्या आरोपाखाली पकडले गेले. कोणतेही लढाऊ भारतीय युध्दकैदी आमच्याकडे नसल्याचे पाकिस्तान सातत्याने सांगत आला आहे.

श्रीमती चंदर सुता डोगरा या ज्येष्ठ महिला भारतीय पत्रकाराने अनेक वर्षांपासून बेपत्ता असलेल्या ५४ सैनिकावर संशोधन केले. तिने सेवानिवृत्त लष्करी अधिकारी, नोकरशहा आणि सैनिकांच्या नातेवाईकांशी चर्चा केली. नातेवाईकांची पत्रे, वृत्तपत्रांचे कात्रण, संस्मरणपत्रिका, डायरीच्या नोंदी, छायाचित्रे आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अज्ञात नोंदीही मिळविल्या आहेत. तिचे सावधपणे-संशोधन करून नवीन पुस्तकाने ( हरवलेल्या कृतीत: कधीच परत न आलेले कैदी ) या मुख्य प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. या सैनिकांचे काय झाले? ते पाकिस्तानात होते हे सिद्ध करण्यासाठी भारताकडे पुरावे आहेत काय? भविष्यात बार्गेनिंग चिप्स म्हणून वापरल्या जाणार्‍या पाकिस्तानमध्ये त्यांना कायमस्वरुपी ताब्यात घेण्यासाठी ते एकत्र आले होते काय ?
हेरगिरी केल्याप्रकरणी भारतीय गुप्तचर एजंट पकडले गेले होते? जिनिव्हा कन्व्हेन्शन – आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार युद्धावर चालणार्‍या आंतरराष्ट्रीय कायद्याच्या उल्लंघनात पाकिस्तानमध्ये पकडल्यानंतर त्यांच्यावर निर्घृण छळ करण्यात आला होता का ? त्या देशाला परत पाठविणे त्यांना फारच अवघड किंवा लज्जास्पद बनले आहे? ताब्यात घेतल्यानंतर काही हरवलेले सैनिक मारले गेले होते का?

सुश्री डोगरा म्हणतात की,
हरवलेल्या सैनिकांपैकी एकाच्या भावाने मला सांगितले की तात्कालीन काँग्रेस सरकार त्याच्या कारवाईमध्ये अयशस्वी झाले.
ते म्हणाले, “युद्धाच्या विजयाच्या उत्साहीतेत आम्ही या सैनिकांना विसरलो.” “मी संपूर्ण काँग्रेस सरकार आणि त्यांच्या औदासिनतेला दोष देतो.
बेपत्ता सैनिकांच्या नातेवाईकांनी दोनदा पाकिस्तानला भेट दिली आहे. सुश्री डोगरा यांनी काही सत्यता शोधून काढल्या आहेत ज्यावरून असे दिसते की युद्ध संपल्यानंतरही काही “बेपत्ता ५४” पाकिस्तानी तुरूंगात जिवंत होते. १९७४ ते १९८० च्या काळात पाकिस्तानकडून परत आलेल्या तीन भारतीय कैद्यांनी अधिका-यांना आणि बेपत्ता सैनिकांच्या कुटुंबीयांना सांगितले की, ते ५४ युद्धकैदी अद्याप जिवंत आहेत. तरीही सरकारकडून काहीही कार्यवाही झाली नाही.
कैद्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना घरी परत आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत असे नाही. त्यांची सुटका व्हावी यासाठी दोन्ही सरकारांनी चर्चा केली आहे.  भारतीय पंतप्रधानांनी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूच्या युद्धातील दिग्गजांनी परतीसाठी मोहीम राबविली. दोन्ही बाजूंच्या कैद्यांची देवाणघेवाण देखील झालेली नाही असे ही नाही. १९७१ च्या युद्धानंतर भारताने सुमारे ९३,००० कैद केलेले पाकिस्तानी सैनिक परत केले आणि पाकिस्तानने ६०० हून अधिक सैनिक परत पाठवले. एवढ्या मोठ्या संख्येने पाकिस्तानचे कैदी परत पाठवत असताना भारताने जर आग्रह धरला असता तर निश्चितच त्या ५४ सैनिकांना देखील भारतात आणता आले असते . १९८३ मध्ये १४ नातेवाईकांचे दोन गट पाकिस्तानात बेपत्ता असलेल्या सैनिकांचे फोटोग्राफ्स आणि इतर तपशील घेऊन पाकिस्तानला गेले होते. तुरूंगात पाहणी करत असताना त्यांना काही भारतीय सैनिक आढळून ही आले. पण पाकिस्तानी नागरिकांनी कैद्यांना भेटण्या-या नातेवाईकांवर दगडफेक केल्यामुळे तो दौरा आटोपता घ्यावा लागला होता. दुसर्‍या भेटीदरम्यान नातेवाईकांनी सांगितले की, “ते जिवंत आणि पाकिस्तानातच आहेत याचा पुरावा आहे”. पाकिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाने याचा इन्कार केला.२००० मध्ये पाकिस्तानी प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही वारंवार असे म्हटले आहे की पाकिस्तानात कोणतेही भारतीय युद्धकैदी नाहीत. आज सुद्धा पाकिस्तान ची हीच ताठर भूमिका कायम आहे.

हा लेख लिहिण्यामागचा उद्देश एवढाच आहे की, त्या ५४ भारतीय युद्धकैद्यांना न्याय मिळावा. या सैनिकांची आता तरी माहिती मिळावी तसेच त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळावा. लोकांच्या विस्मृतीत गेलेल्या या सैनिकांची सत्यकथा परत चर्चिली जावी यासाठी हा खटाटोप आहे. त्यामुळे १९७१ (1971) हा चित्रपट पूर्वी बहुसंख्य भारतीयांपर्यत फारसा पोहोचू शकला नव्हता. पण या लेखामुळे सर्व वाचक हा चित्रपट नक्कीच युट्युब वर घरबसल्या पाहतील. हा चित्रपट शेवटपर्यंत पाहावा अशी कळकळीची विनंती मी करतो. माझा त्यात कोणताही स्वार्थ किंवा आर्थिक फायदा नाही.
हा मास्टरपीस असलेला १९७१ अशा शीर्षकाचा विचारप्रवर्तक, प्रेरणादायी चित्रपट राष्ट्रकर्तव्य म्हणून संपूर्ण पहा. सर्व वयोगटाला आवडेल असा हा दर्जेदार चित्रपट पाहण्यासाठी थोडा वेळ काढा. https://youtu.be/gp3otKG7o6g या लिंक वर चित्रपट मोफत पाहता येतो.
मला खात्री आहे की, त्यानंतर सर्वजण हा चित्रपट पाहण्याची इतरांना शिफारस पण करतील यात कोणतीही शंका नाही. माझ्या आग्रहासाठी तरी एकदा हा चित्रपट नक्की पाहणार ना.
मला खात्री आहे देशासाठी सर्वस्व बलिदान करण्याची तयारी ठेवणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी आपण एवढे तर निश्चितच करू शकतो.
जय हिंद

लेखक:धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर,नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *