जिल्ह्यातील 3 हजार 779 अंगणवाड्यांना आता वृक्ष लागवडीतून सुपोषणाचा मंत्र -मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांची कल्पकता

नांदेड :- ज्या अंगणवाड्यामध्ये बडबडगीतासह चिमुकले पोषणाचा स्वाद घेतात त्याच अंगणवाड्यामधून आता आरोग्यवर्धक वृक्ष लागवडीतून कृतीशील सुपोषणाचा मंत्र चिमुकल्याच्या माध्यमातून घराघरात पोहचणार आहे. ही अभिवन योजना नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने सुरु करण्यात आली आहे. घरोघरी मोठया श्रद्धेने निसर्गाच्या समीप घेवून जाणारा महिलांचा सण म्हणून हरतालिकाकडे पाहिले जाते. याचे अचूक औचित्य साधून नांदेड जिल्ह्यातील 3 हजार 779 अंगणवाडयामध्ये प्रत्येकी दोन वृक्ष याप्रमाणे एकूण 6 हजार 785 वृक्षांचे रोपण नुकतेच करण्यात आले. प्रत्येक अंगणवाडी दोन वृक्ष या गणितासमवेत अंगणवाडीची जबाबदारी असणाऱ्या एक झाड अंगणवाडी सेविकेच्या नावाने तर दुसरे झाड मदतनिसाच्या नावे करण्यात आले आहे हे विशेष.

गावातील चिमुकल्यांच्या सुपोषणासाठी तसेच त्याच्या पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी, गरोदर महिलांच्या व स्तनदा मातांच्या पूरक आहारासाठी अंगणवाडी हा शासनाचा अत्यंत महत्वाचा दुवा आहे. अंगणवाडीत देण्यात येत असलेल्या आहाराची पौष्टिकता वाढावी, तो आहार खऱ्या अर्थाने सकस व्हावा यासाठी त्यात शेवग्याच्या शेंगाचा तसेच पानांचा खूप मोठा उपयोग करता येणे शक्य आहे. हे लक्षात घेवून ग्रामीण भागात घरोघरी हा संदेश पोहचावा यादृष्टीने हा अभिवन उपक्रम अधिक महत्वाचा असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

या अभिवन उपक्रमांचा शुभारंभ नांदेड जवळील लिंबगाव येथील अंगणवाडीतून प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घूगे, महिला व बाल विकास विभागाच्या सभापती श्रीमती सुशिलाताई हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कूलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रेखा काळम-कदम, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *