माहुर ;
मुरूम उत्खनन केलेल्या खड्ड्यातील पाण्यात बूडून शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि.२९ रोजी घडली असून याबाबत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
माहूर तालुक्यातील मौजे रेवानाईक पार्डी येथील इयत्ता सातवीत शिकणारा (मृतक) अभय गणेश चव्हाण वय १४ वर्षे हा आज सकाळी 10:30 वा च्या सुमारास मछिंद्र पार्डी ते वडसा रोडवर रोडच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू पावला. याबाबत मृतकाचे वडील गणेश गेमसिंग चव्हाण यांनी दिलेल्या खबरीवरून सिंदखेड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली ती शेत सर्वे नंबर ७१ ही शेतजमीन एका आदिवासी शेतक-याची असून त्या जमीनीची खरेदी होत नसल्याने एका महामार्ग कंत्राटदाराने ती जमीन लिजवर घेण्याचा खटाटोप करून त्या ठिकाणचे मोठ्या प्रमाणात उत्खनन केले असल्याचे मृतकाच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे. या ठिकाणी तब्बल ३० फुटापर्यंत अवैधरीत्या उत्खनन केले आहे.
ती आजमितीस पावसाच्या पाण्याने तुडूंब भरले आहेत. त्याशेजारी खेळत असताना अभयचा तोल जावून पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी संबंधित कंत्राटदारावर गुन्हे दाखल करणार असल्याची माहीती मृतकाच्या कुटुंबियांनी दिली आहे. दरम्यान वाई बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतकाचे शवविच्छेन केल्यानंतर मौजे रेवानाईक पार्डी येथे मृतकावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.