संगीत शंकर दरबार महोत्सवात यावर्षी पद्मश्री सुरेश वाडकर, डॉ.अश्‍विनी भिडे, उस्ताद शाहीद परवेझ अशा दिग्गज कलावंतांची मांदियाळी राहणार माजी आमदार सौ.अमिताताई चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती

नांदेड, दि.17 :- माजी केंद्रीय गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राच्या जलसंस्कृतीचे जनक कै. डॉ. शंकरराव चव्हाण आणि कै. सौ.कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने दरवर्षी निःशुल्क आयोजित करण्यात येणाऱ्या संगीत शंकर दरबार महोत्सवाचे यंदाचे हे 20 वे वर्ष असून यावर्षीही नांदेडकर रसिकांसाठी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यानिमित्ताने यावर्षी पद्मश्री सुरेश वाडकर, डॉ. अश्‍विनी भिडे-देशपांडे, पद्मश्री उस्ताद शाहीद परवेझ, भाग्येश मराठे, भुवनेश कोमकली अशा दिग्गज कलावंतांची मांदियाळी आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत, अशी माहिती श्री शारदा भवन शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा तथा माजी आमदार सौ. अमिताताई अशोकराव चव्हाण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली आहे.या पत्रकार परिषदेला कु. श्रीजया अशोकराव चव्हाण, माजी महापौर मंगलाताई निमकर, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, सहसचिव प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर, कोषाध्यक्ष ॲड. उदयराव निंबाळकर, संजय जोशी, गिरीश देशमुख, प्राचार्य गणेश शिंदे , संतोष पांडागळे, प्रा.विश्‍वाधार देशमुख यांची उपस्थिती होती.

आयटीएम येथील कॉन्फरन्स हॉल येथे यानिमित्ताने आज शनिवारी ( दि.17) पत्रकारांशी संवाद साधताना माजी आमदार सौ. अमिताताई अशोकराव चव्हाण पुढे म्हणाल्या की, संस्थेचे सचिव व माजी पालकमंत्री डी.पी . सावंत आजारी आहेत.त्यामुळे मी पहिल्यांदाच या संदर्भात पत्रकारांशी बोलत आहे असे सांगून त्या नंतर म्हणाल्या की अवघ्या मराठवाड्यातील संगीत रसिकांसाठी अतिउच्च दर्जाची संगीत मेजवानी म्हणून प्रसिध्द ठरलेल्या या संगीत महोत्सवाचे हे 20 वे वर्ष असून यावर्षी येत्या दि.25 फेब्रुवारी रोज रविवारी सायंकाळी 6:00 वाजता कु. सुजया आणि कु. श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते पूर्वसंध्येच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून त्यानंतर ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांचा ओंकार स्वरूपा हा बहारदार कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवार दि.26 फेब्रुवारी रोजीच्या कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी 5:30 वाजता अभिषेक बोरकर यांच्या सरोद वादनाने होणार असून त्यानंतर ज्येष्ठ गायिका डॉ. अश्‍विनी भिडे-देशपांडे ( मुंबई ) यांच्या हस्ते यावर्षीच्या संगीत महोत्सवाचे उद्घाटन होणार असून श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. या कार्यक्रमात संगीत शंकर दरबार जीवनगौरव पुरस्कार-2024 प्रदान केला जाणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार अमरनाथ राजूरकर आणि आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी भाग्येश मराठे ( मुंबई ) यांचे शास्त्रीय गायन होणार असून त्यानंतर डॉ. अश्‍विनी भिडे-देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने या दिवशीच्या कार्यक्रमांची सांगता होणार आहे.

त्यानंतर तिसऱ्या दिवशी दि.27 फेब्रुवारी रोज मंगळवारी सायंकाळी 6:00 वाजता श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा तथा माजी आमदार सौ. अमिताताई अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून त्यानंतर यशस्वी सरपोतदार ( पुणे ) आणि नंतर भुवनेश कोमकली ( देवास ) यांचे शास्त्रीय गायन होणार आहे.तसेच ख्यातकीर्त सतार वादक पद्मश्री उस्ताद शाहीद परवेझ ( पुणे ) यांचे सतार वादन होणार असून मुकेश जाधव हे तबल्यावर साथसंगत करणार आहेत. त्यांच्या सतार वादनाने या तीन दिवसीय संगीत महोत्सवाचा समारोप होणार आहे.

तसेच हे वर्ष पंडित राम मराठे आणि पंडित कुमार गंधर्व यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने या महान गायकांप्रती कृतज्ञता प्रकट करण्याच्या हेतूने त्यांचे नातू भाग्येश मराठे आणि भुवनेश कोमकली यांचे शास्त्रीय गायन यावर्षीच्या महोत्सवात आवर्जून ठेवण्यात आले आहे, असेही माजी आमदार सौ. अमिताताई चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान,सलग तीन दिवस चालणाऱ्या या संगीत महोत्सवातील सर्व कार्यक्रम यशवंत महाविद्यालयाच्या क्रीडा मैदानावर उभारण्यात येणाऱ्या भव्य स्वरमंचावर संपन्न होणार आहेत. समस्त रसिकांचे भावविश्‍व समृद्ध करणाऱ्या आणि त्यांच्या उदंड प्रेमाच्या बळावर अवघ्या दोन दशकांत भारतातील अग्रगण्य संगीत महोत्सवांच्या यादीत समाविष्ट झालेल्या या निःशुल्क संगीत शंकर दरबार महोत्सवाचा जास्तीत जास्त रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री शारदा भवन सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, उपाध्यक्षा तथा माजी आमदार सौ. अमिताताई चव्हाण, सचिव तथा माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, सहसचिव प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर, कोषाध्यक्ष ॲड. उदयराव निंबाळकर, संजय जोशी, रत्नाकर आपस्तम्ब, गिरीश देशमुख, प्रा. विश्‍वाधार देशमुख यांच्यासह संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

पं. शाम गुंजकर यांना जीवन गौरव पुरस्कार
चौकट :- संगीत क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलावंताला दरवर्षी संगीत शंकर दरबार जीवन गौरव पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार गानमहर्षी डॉ. अण्णासाहेब गुंजकर व पंडित जसराजजी यांचे शिष्य पंडीत शाम गुंजकर यांना प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती संयोजक श्री संजय जोशी यांनी यावेळी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *