मुखेड: (दादाराव आगलावे)
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेल्या “छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (CSMS-DEEP)” या योजनेच्या लाभार्थी विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जोशीन फोटो मुखेडच्या वतीने इन्फोटेक चे संचालक जय जोशी यांच्या पुढाकारातून मुखेड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत येथे जावून, ग्रामसभेमध्ये मराठा व कुणबी मराठा समाजातील युवक व युवतींसाठी सुरू असलेल्या अनेक मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाची माहीती दिली.
त्यात संघ लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा मोफत प्रशिक्षण, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा मोफत प्रशिक्षण, परदेशी भाषा शिक्षण अभ्यासक्रमाचे सारथी मार्फत शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ति योजना, UGC-NET/SET, एम.फील. / पीएच. डी. करणा-या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती, सारथी कौशल्य विकास कार्यक्रम, दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना परीक्षा, कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्चशिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना अश्या अनेक योजनेची माहिती देवून ग्रामीण भागातील मराठा व कुणबी मराठा समाजाला जागृत करण्याचे काम केले.
या जनजागृतीसाठी स्वत: सारथीचे लाभार्थी विद्यार्थ्यांनी आपल्याला या योजनांचा कसा लाभ मिळत आहे, संगणक कौशल्य आणि, मृदु कौशल्य शिकून ते स्वत: कसे आत्मनिर्भर झालेले आहेत, याची माहिती दिली, तसेच आजच्या डिजिटल जगात ग्रामीण भागातील महिला यांना लाडकी बहीण, तसेच शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी असे अनेक आर्थिक कामे मोबाईल वापरुन करावे लागते, त्यामुळे यांची मोबाईल व तत्सम उपकरणावरून फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहेत, त्यातून आपण स्वत:ला कसे सुरक्षित करावे, यासाठी सारथीच्या विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा विषयक माहिती दिली. या उपक्रमाचे तहसीलदार, सरपंच, ग्रामसेवक, व ग्रामस्थांनी कौतुक केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी एम के सी एल चे नांदेड लोकल लिड सेंटर, मुखेडचे जोशी इन्फोटेक यांनी प्रयत्न केले.