नांदेड, दि. २८ जानेवारी २०२५:
श्री केदार जगदगुरूंचा आशीर्वाद नेहमीच चव्हाण कुटुंबियांसोबत राहिला असून, त्यांचा आदेश आमच्यासाठी शिरोधार्य असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.
शिवरात्रीच्या मुहूर्तावर येथील श्री केदारेश्वर सत्संग भवनात आयोजित महाप्रसाद सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी श्री केदार जगदगुरुंच्या हस्ते भोकरच्या नवनिर्वाचित आमदार श्रीजया चव्हाण यांचा आशीर्वादपर सत्कार करण्यात आला. मंचावर माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, माजी आमदार सौ. अमिताताई चव्हाण, आ. श्रीजया चव्हाण, कार्यक्रमाचे आयोजक भाजपचे जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे आदी उपस्थित होते. या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना खा. चव्हाण पुढे म्हणाले की, डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून आमच्या कुटुंबाने प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर शिराढोण येथील गादीचा आशीर्वाद घेतला आहे. संत-महात्म्यांचा आशीर्वाद असेल तर चांगल्या कामात यश निश्चित असते. मात्र, त्याला आपल्या मेहनतीचीही जोड द्यावी लागते.
या सोहळ्यात प्रा. शशिकांत दरगू व अॅड. ओंकारेश्वरी कदम यांची व्याख्याने झाली. डी.पी. सावंत, सौ. अमिताताई चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनीही थोडक्यात आपल्या भावना मांडल्या. कार्यक्रमाचा समारोप करताना श्री केदार जगदगुरू यांनी आपल्या आशीर्वचनात पुढील काळातील कार्यक्रमांची कल्पना मांडली. सूत्रसंचालन राज्याचे माजी शिक्षण संचालक गोविंदराव नांदेडे यांनी केले. कार्यक्रमाच्या अखेरीस सौ. सुषमा पांडागळे यांनी हळदी-कुंकूंचा कार्यक्रम ठेवला होता. याप्रसंगी शेकडो भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बाबुराव पांडागळे, बालाजीराव पांडागळे, गोविंद पांडागळे, सुरेश नागठाणे, संजय कहाळेकर, मधुकर फुलवळे, संदीप टाकळे आदींना परिश्रम घेतले.