अहमदपूर ( प्रतिनिधी )
पुरोगामी साहित्य परिषद अहमदपूरच्या वतीने दि २८ डिसें २५ रोजी पंचायत समितीच्या सभागृहात गुलामीकडे बोट, किसानपुत्रांच्या कविता या परिसर प्रकाशन आंबेजोगाई यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रम पार पडला.त्यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील खंडाळीकर यांनी या कविता संग्रहावर भाष्य करताना ते म्हणाले की , राष्ट्रपिता महात्मा फुल्यानी १२५ वर्षापूर्वी गुलामगिरी सारखा अजरामर ग्रंथ लिहून आम्हाला आमच्यावर मनुवादी व्यवस्थेने थोपवलेल्या गुलामगिरीची आठवण करून दिली. त्यानंतर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानंतरही आम्हाला परत एकदा गुलामगिरीची चर्चा करावी लागणे हे आजच्या समाजव्यवस्थेचे भीषण वास्तव आहे. असे मला चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून वाटते.
गेल्या तीन चार दशकात पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून मी जे काही या संबंधीचे चिंतन केले आहे त्यावरून मला असे वाटते की,भारतासारख्या कृषीप्रधान देशात जिथे जवळपास ७०% समाज आजही शेती करतो. तरीसुद्धा शेतकरी व शेतमजूर आजही गुलामीच्या अवस्थेत अडकून पडला आहे .याचे महत्त्वाचे कारण हे आहे की, इथला ७० % समाज कुणबी असूनही तो गुलामीच्या अवस्थेत जगत असल्याचे पाहायला मिळते. याची कारणमीमांसा केली असता असे लक्षात येते की, शेतीच्या प्रश्नावर इथल्या समाजाला सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक एकत्र येऊ दिलेले नाही .तो समाज कधी जातीच्या नावावर तर कधी धर्माच्या नावावर विभागणी करून त्याला त्याच्या मूळ प्रश्नापासून बाजूला केले गेले .हे वास्तव समजून घ्यायला हवे.
खरेतर हा ७० % समाज कुणबी असलेल्या शेतकरी वर्ग आपल्या न्याय मागण्यांच्या हक्कासाठी ज्या ज्या वेळी रस्त्यावर उतरला त्या त्या वेळी सत्ताधाऱ्यांनी त्याची दिशाभूल करून त्याला गुलामीच्या खाईत ढकलले .हे मान्य करावेच लागते .या संदर्भात विवेचन करताना खंडाळीकर म्हणाले की , स्वातंत्र्याच्या नंतर शेतकऱ्याने मतदानाच्या अधिकाराचा योग्य पद्धतीने वापर केला असता तर येथील मनुवादी जातीवादी व्यवस्था व धर्म सत्तेला हादरे बसले असते. पण तसे होऊ नये म्हणून येथील सत्ताधाऱ्यांनी अतिशय धूर्तपणे शेतकऱ्यांची जाती जातीमध्ये विभागणी केल्यामुळे शेतकऱ्यांना न्यायापासून वंचित राहावे लागले .
उदा. विद्यमान सरकारने टीकेत यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने मंजूर केलेले जुलमी कृषी कायदे रद्द करण्यासाठी व आपल्या न्याय मागण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन केले. त्यावेळी इथल्या मनुवादी मानसिकता असलेल्या केंद्र सरकारने या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरियाणाच्या व दिल्लीच्या सीमेवर रस्त्यावर खिळे ठोकून प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना सीमेवरच अडवून ठेवले व दिल्लीमध्ये येण्यास मज्जाव केला. तसेच या वास्तव प्रश्नाकडे देशातील साहित्यिक , विचारवंत , लेखक , बुद्धिवंत लक्ष देत नाहीत. तसेच या प्रसंगावर त्यांनी शेतकरी आंदोलकाच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी मौन स्वीकारले. ही सुद्धा शेतकरी विरोधी नीतीचे उदा म्हणावे लागेल.
दुसरे उदा देताना ते म्हणाले की , महाराष्ट्रात शरद जोशीच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या माध्यमातून एक मोठा झंजावात शेती प्रश्नाच्या अनुषंगाने निर्माण झाला होता.
राज्यभरात मोठ्या प्रमाणावर लाखो शेतकऱ्यांची अनेक ठिकाणी आंदोलने झाली होती. या आंदोलनामध्ये राज्यभरातील लाखो शेतकरी सहभागी झाले.खरे तर शरद जोशीच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाने अनेक विक्रम मोडले गेले .असे असूनही शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागल्याचे दिसत नाही. हे वास्तव शेतकरी नेते शरद जोशी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपली राजकारण विरहित भूमिका सोडून देऊन राजकीय भूमिका स्वीकारली व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी संसदेत तसेच राज्याच्या विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी इथल्या सत्ताधारी वर्गाने त्यांची सर्व शक्ती पणाला लावून हे आंदोलन मोडीत काढले .हे वास्तव आपण समजून घेतले पाहिजे .
ज्या ज्या वेळी या देशातील ७०% बहुसंख्यांक शेतकरी असलेला हा समाज संघटित होण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी हे राज्यकर्ते अतिशय धूर्तपणे कधी जातीच्या नावावर तर कधी धर्माच्या नावावर त्यांच्यात फूट पाडून त्यांना न्यायापासून वंचित ठेवतात. हे येथील समाज जीवनाचे वास्तव आहे. परंतु आपण मात्र शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायासाठी सत्ताधाऱ्यांना जबाबदार न धरता कधी डाव्यांना , तर कधी समाजवाद्यांना दोषी ठरवत असतो हे आपण नीट समजून घेतले पाहिजे .
भविष्यात खरोखरच शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्यांना या गुलामीतून मुक्त करण्यासाठी आंदोलनाने नव्याने पर्यायी कार्यक्रम शेतकऱ्यांच्या समोर ठेवावा लागेल व या प्रश्नाच्या अनुषंगाने विविध व्यासपीठावरून चर्चासत्रे, परिसंवाद , साहित्य यांच्या माध्यमातून वास्तव समाजासमोर मांडून शेतकऱ्यांचे प्रबोधन करून शेतकरी व शेतमजूर यांची एकजुट करून एक संघटित ताकद येणाऱ्या काळात उभी करून सरकारवर दबाव आणणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक प्रभाकर साळेगावकर हे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मच्छिंद्र गोजमे , अमर हबीब,शिवाजी स्वामी , वामन साबळे हे उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरोगामी साहित्य परिषदेचे सचिव एन डी राठोड यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी प्रा. अनिल चवळे यांनी केले. शेवटी आभार प्रा. भगवान अआमलापुरे यांनी मांडले. प्रभाकर तिडके आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने परिसरातील कवी व नागरिक उपस्थित होते .

