कोट्यवधींच्या थकीत कर्जवसुलीसाठी तज्ज्ञांची समिती;पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी घेतला जिल्हा बँकेचा आढावा

नांदेड – जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला मतदारांनी एकहाती सत्ता दिली असून आता जबाबदारी अधिकची वाढली आहे. त्यामुळे अध्यक्ष – उपाध्यक्ष यांच्यासह सर्वच संचालकांनी झपाटून कामाला लागले पाहिजे, असे सांगतानाच बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या थकीत कर्जाची वसुली व्हावी यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी, अशी सूचना पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज येथे केली. यासोबतच त्यांनी बँकेच्या आर्थिक बाबींचा संपूर्ण आढावा घेतला.

जिल्हा मध्यवर्ती बँकेत पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने एकहाती सत्ता मिळविली आहे. त्यानंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी माजी आ. वसंतराव चव्हाण तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांची काल दि.16 रोजी निवड करण्यात आली. त्यानंतर लागलीच आज दि.17 रोजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृहामध्ये नवनिर्वाचित पदाधिका-यांसह संचालक मंडळाची बैठक पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी घेतली.

जिल्हा बँकेचे 658 कोटी रुपयांचे थकीत कर्ज येणे बाकी आहे. त्यातील शेतीकर्ज फक्त 16.67 कोटी असून जिल्ह्यातील 20 मोठ्या संस्थांकडे इतर कर्जे वसुलीअभावी बाकी आहेत. बँकेचा एनपीए तब्बल 29.58 टक्क्यांवर पोहोंचला आहे. त्यामध्ये 194 कोटीचे कर्ज एनपीएमध्ये गेले आहे. जिल्ह्यातील संस्थांकडे असलेल्या या कर्जवसुलीसाठी चार तज्ज्ञांची समिती स्थापन करावी, अशी सूचना पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज येथे केली. या समितीमध्ये बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक, सनदी लेखापाल व उच्च न्यायालयातील एका ज्येष्ठ विधीतज्ज्ञाचा समावेश करावा, असे सांगतानाच या समितीने सर्व कायदेशीर बाबी तपासून एक महिन्याच्या आत अहवाल द्यावा, असेही पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी यावेळी सांगितले. 

 शासनस्तरावर साखर कारखान्याची घेतलेली थकहमी रक्कम वसूल करणे, कलंबर सहकारी साखर कारखाना विक्री प्रक्रियेचा पाठपुरावा करणे या बाबींकडे आपण लक्ष घालून हा प्रश्न निकाली लावण्याचे आश्वासन पालकमंंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिले. राज्यातील इतर चांगल्या बँकांचे अनुकरण करत जिल्हा बँकेला गतवैभव मिळवून देण्यासाठी संचालकांनी प्रयत्न करावेत, असे सांगतानाच शासनाकडून विविध योजनांतर्गत बँकेस प्राप्त झालेल्या शेतक-यांच्या अनुदानाचे वाटप जलद गतीने करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.  

बँकेच्या जिल्ह्यात एकूण 64 शाखा असून या सर्व शाखांमधील कर्मचा-यांच्या गरजेनुसार योग्य त्या ठिकाणी नेमणुका करण्यात याव्यात, अशा सूचना करतानाच जिल्हा बँकेच्या गतवैभवासाठी सर्वांनी समर्पित भावनेने काम करावे, असेही पालकमंत्री म्हणाले. या बैठकीस विधान परिषदेचे प्रतोद आ.अमरनाथ राजूरकर, आ.मोहनअण्णा हंबर्डे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, संचालक माजी आ. हनमंत पाटील बेटमोगरेकर, मोहन पाटील टाकळीकर, गोविंदराव नागेलीकर, बाबूराव कोंढेकर, विजयसिंह देशमुख, शिवराम लूटे, व्यंकटराव जाळणे, विजयाबाई शिंदे, जि.प.चे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, रामचंद्र मुसळे, बँकेचे सरव्यवस्थापक अरविंद शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम आदींची उपस्थिती होती. 


मालेगावचे कोवीड सेंटर सोमवारी कार्यान्वीत  तर अर्धापूरचे लवकरच सुरु होणार 

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सूचनांची अंमलबजावणी

अर्धापूर – अर्धापूर तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मालेगाव येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये कोवीड रुग्णालय सोमवारपासून कार्यान्वीत करण्यात येणार आहे.  तर अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात येत्या चार दिवसात कोवीड सेंटरची सुरुवात करण्यात येणार आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या संदर्भात जिल्हा प्रशासनास सूचना केल्या होत्या. या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे.

अर्धापूर तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन अर्धापूर आणि मालेगाव येथे कोवीड केअर सेंटर व रुग्णालयाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांची होती. या मागणीची दखल घेत पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी एका आढावा बैठकीत या दोन्ही ठिकाणी कोवीड केअर सेंटरची स्थापना करण्यात यावी, अशा सूचना केल्या होत्या. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी मालेगाव येथील कोवीड सेंटरच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी रुग्णालयास भेट दिली. व सोमवार दि.19 पासून हे कोवीड सेंटर सुरु होणार असल्याचे यावेळी सांगितले. त्यासोबतच या ट्रामा केअर सेंटरमधील सर्व सेवासुविधांचा जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी आढावा घेतला. या कोवीड सेंटरसाठी आवश्यक असलेला डाॅक्टर व नर्सेसचा स्टाॅफ उपलब्ध करून देण्यात आला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नागरिकांची मागणी लक्षात घेऊन हे कोवीड सेंटर निर्माण केल्याबद्दल पालकमंत्री अशोकराव चव्हाण व जिल्हाधिकारी डाॅ.विपीन इटनकर यांचे मालेगावचे सरपंच अनिल इंगोले, उपसरपंच मोहन खंदारे, ईश्वर पाटील यांच्यासह गावक-यांनी आभार मानले.

अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात येत्या चार दिवसात कोवीड सेंटर स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती डाॅ. विपीन इटनकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *