नांदेड : जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी विकासकामांचा अक्षरशः धडाका सुरू केला असून देगलुर विधानसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी पुरवणी अर्थसंकल्पात 208 कोटी मंजूर करून घेत असतानाच भोकर येथे शंभर खाटाचे उपजिल्हा रुग्णालय शासनाकडून मंजूर करून घेतले आहे.
भोकर येथे उपजिल्हा रुग्णालय असावे अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून नागरिकांतून होत होती. या मागणीचा विचार करून व ग्रामीण रुग्णालयातील गर्दी लक्षात घेऊन मागील पाच वर्षांपूर्वी तत्कालीन तत्कालीन भाजप सरकारकडे १०० खाटाचे उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव सादर केला होता. परंतु हा प्रस्ताव धुळखात पडला होता. या बाबत पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पुढाकार घेत भोकर येथे १०० खाटाचे उपजिल्हा रुग्णालय मंजुर करून घेतले आहे.
नांदेड जिल्ह्यात सध्या किनवट,कंधार,हदगाव, देगलुर या चार ठिकाणी 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित आहेत.त्यापैकी देगलुर येथे नुकतीच 100 खाटांची मान्यता मिळाली आहे.त्यातच आता भोकर येथे आता 100 खाटाचे नवीन रुग्णालय पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मंजूर करून घेतले आहे. भोकर शहरात ग्रामीण रुग्णालय व अपघात विभाग तर ग्रामीण भागात चार प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या रुग्णांची काळजी घेत आहेत. एका प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ बाह्य रुग्ण सेवा चालू आहे. तर आरोग्य वर्धिनी चा आधार ही मिळतो आहे. तरी पण भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गर्दी असते.
कोरोना च्या अगोदर भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज ४०० ते ४५० रुग्णांची वर्दळ असायची सध्या १५० ते २०० रुग्णावर येथे उपचार केले जात आहेत. यामुळे उपजिल्हा रुग्णालयाची गरज होती ती आता पूर्ण झाली आहे.
सदरील शंभर खाटाचे उपजिल्हा रुग्णालयाला शासनाने मंजुरी दिली असून या नंतर रूग्णालयासाठी जागा अधिग्रहित करण्यात येणार आहे. यानंतर बांधकाम व पदनिर्मिती साठी स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार आहे.हे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून घेतल्या बद्दल पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे भोकर तालुक्यातील जनतेने आभार मानले आहेत.