पोलादपूर : (रवींद्र मालुसरे)
पाणी ही माणसाची मूलभूत गरज असल्याने संकटग्रस्त लोकांसाठी तातडीने धावून जाणे गरजेचे असल्याने आम्ही सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका जपली अशी भावना हिंदुस्थान माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष विकास मयेकर व्यक्त केली. २२ जुलैच्या अतिवृष्टीमूळे पोलादपूर तालुक्यातील कामथी नदीला आलेल्या बेफाम पुरात साखर खडकवाडी व आडावळे खडकवाडी या दोन गावांसाठी असलेल्या नळपाणी योजनांचे दोन्ही पंपघर मोटर व इलेक्ट्रिक मोटर मशीन केबलसह संपूर्णतः वाहून गेले होते. त्या पंपघराचे उद्घघाटन मयेकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष बाजीराव मालुसरे, संयुक्त सरचिटणीस शंकर झोरे, रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश डफळे, वाहतूक सेना उपाध्यक्ष गिरीश विचारे, शिवसेना युवानेते अनिल मालुसरे आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
गेले महिनाभर पावसाने उघडीप घेतल्याने ना नळाचे पाणी ना पावसाने पडणाऱ्या वळचणीचे पाणी अशा संकटात ग्रामस्थ पाण्याविना सापडले होते. याची दखल घेत पोलादपूर नाईक मराठा समाज मुंबईचे कार्याध्यक्ष व फोर्टचे माजी शाखाप्रमुख बाजीराव मालुसरे आणि सामाजिक कार्यकर्ते दीपेश मालुसरे यांनी सिंहाचा वाटा उचलत तातडीने दोन्ही गावातील चाकरमानी तरुणांच्या मदतीने शासनाच्या मदतीची वाट न पाहता काम पूर्ण केले.
यातल्या फार मोठ्या आर्थिक खर्चाचा भार हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेने उचलून सामाजिक भूमिका पार पाडली.
पोलादपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भूसख्खलन होत दरडी कोसळून घरांसह मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती.
तिन्ही नद्यांना आलेल्या बेफाम पुरांमुळे तर दोन्ही बाजूच्या शेतजमिनी वाहून गेल्या त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत तो उध्वस्त झाला आहे याची पाहणीही त्यांनी केली. कोरोनाच्या आजारामूळे बाधित रुग्ण ग्रामीण भागातून महाड कोविड रुग्णालयापर्यंत सुखरूप पोहोचावा यासाठी संघटनेच्या वतीने पितळवाडी आरोग्य केंद्राला ऑक्सिजन सिलेंडर वैद्यकीय मदत म्हणून भेट देण्यात आले.