नांदेड – येथील देगावचाळच्या रमामाता आंबेडकर महिला मंडळाच्या वतीने जागतिक बौद्ध परिषद बँकाॅक थायलंडचे प्रादेशिक केंद्र प्रज्ञा करुणा विहार येथे अशोक विजयादशमी म्हणजेच ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दि. १५ रोजी शुक्रवारी दिवसभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांना अॅड. मा.मा. येवले, माजी मनपा उपायुक्त प्रकाश येवले, विभागीय अभियंता पी. एन. पडघणे, दै. सत्यप्रभाचे उपसंपादक मिलिंद दिवेकर, रमेशभाऊ गोडबोले नगरसेवक प्रतिनिधी, विलासदादा धबाले नगरसेवक प्रतिनिधी, सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत सावळे साहित्यिक समीक्षक गंगाधर ढवळे, शिमबाक समिती मनपाच्या उपसभापती ज्योत्स्नाताई गोडबोले, मनपा नगरसेविका दीक्षाताई धबाले, सामाजिक कार्यकर्ता रवि पंडित तुप्पेकर, धम्म कार्यकर्ते डी. एन. कांबळे, नामदेव थोरात यांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती उपासक सुभाष लोखंडे यांनी दिली.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सकाळी १०.३० वाजता पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे विश्वस्त अॅड. मा. मा. येवले यांच्या हस्ते संपन्न होईल. त्यानंतर सुमित धोत्रे (आयएएस), बालरोगतज्ज्ञ डॉ. जयश्री सावळे, स्वारातिम विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्राप्त सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ डी. यु. गवई, स्वारातिम विद्यापीठाचे रसायन शास्त्र विभाग संचालक तथा स्वारातिम विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राध्यापक पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ भास्कर दवणे, ग्रंथ वाचक राहुल कोकरे धनजकर, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त कवयित्री छाया कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, पत्रकार राजेश्वर कांबळे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रकाश येवले हे भूषविणार असून दुपारी भोजनदान, सायंकाळी ५ वाजता सुप्रसिद्ध गायक क्रांतीकुमार पंडित प्रस्तुत क्रांतीसुर्य ऑर्केस्ट्रा यांच्या बुद्ध भीम गितांचा बहारदार कार्यक्रम होईल. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन रमामाता महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे