दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन
प्रतिनिधी, कंधार
सोशल मीडियामुळे वाचन संस्कृती हळूहळू लोप पावत चालली आहे. मात्र वाचन संस्कृती टिकवण्यासाठी व वाढविण्यासाठी युवा पिढीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रो.डाॅ.गंगाधर तोगरे यांनी केले.
कंधार शहरातील विचार विकास मंदिर वाचनालयात बुधवारी १० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता दिवाळी अंक २०२१ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रो.डाॅ.गंगाधर तोगरे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक सौ.अनिता दाणे, स्वच्छतादूत तथा पत्रकार राजेश्वर कांबळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल रफीक शेख, विचार विकास मंदिर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड.मारोती पंढरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विचार विकास मंदिर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड.मारोती पंढरे यांनी करून वाचनालयाची परंपरा व दिवाळी अंकांचे प्रदर्शन याविषयी भूमिका विशद केली.
पुढे बोलताना प्रो.गंगाधर तोगरे म्हणाले की, विचार विकास मंदिर वाचनालय हे तालुक्यातील पहिले वाचनालय आहे. या वाचनालयास ७१ वर्षं झाली आहेत. या वाचनालयात विविध ग्रंथ उपलब्ध आहेत. या ग्रंथांतून विविध माहिती मिळते. त्यामुळे ज्ञानात भर पडून माणसाच्या जीवनाला कलाटणी मिळते.
मात्र सोशल मीडियामुळे वाचन संस्कृती हळूहळू लोप पावत चालली आहे. युवा पिढीने वाचन संस्कृतीचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे. वाचनालय हेच सुसंस्कृत समाज घडवण्याचे एकमेव साधन आहे. वाचन संस्कृतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे,असे ते म्हणाले.
यावेळी सौ.अनिता दाणे म्हणाल्या की, दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरवणे काळजी गरज आहे. प्रत्येकांच्या घरांमध्ये दोन ग्रंथ असणे आवश्यक आहे. सध्या वाचन संस्कृती नष्ट होत आहे. त्याला तुम्ही-आम्ही जबाबदार आहोत. कारण वाचन संस्कृतीचे हस्तांतरण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होत असते. वाचन संस्कृती टिकली पाहिजे. रुजली पाहिजे. यासाठी समाजातील प्रत्येक घटकांने पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी विजय बोधनकर, मनोज गाजरे, अनिस शेख, कांबळे काका, राजू इंदुरकर, आली साहेब आदींसह वाचकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ग्रंथपाल जगदीश धोंड यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.
तसेच १० ते ३० नोव्हेंबर दरम्यान वाचकांनी दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.