कंधार ; दिगांबर वाघमारे
नागरिकांच्या समस्यां गावातच सोडवल्या जाव्या ,त्यांची शासकीय कामे गावातच व्हावी या उद्देशाने शासनाकडून लाखो रुपये खर्च करुन ‘शासन आपल्या दारी’ ही मोहीम राबविल्या जाते.परंतू हि केवळ कागदोपत्रीच राबविली गेल्याने जनतेचे प्रश्न अद्याप जैसे थेच आहेत.अनेक मतदार संघातील तालुक्याच्या ठिकाणी आमदार,खासदार यांच्याकडून जनता दरबार भरविला जातो.या दरबाराच्या माध्यमातून अनेक समस्या सोडवल्या जातात.एवढेच नव्हे तर मंत्रालयामध्येही काही मंत्री जनता दरबार भरवुन अनेकांच्या समस्या सोडवल्या जातात. कंधार मध्ये मात्र आमदार व खासदार यांची जनता दरबाराबद्दलची उदासिनता पाहता माजी सैनिक संघटनेने पुढाकार घेतला आहे .
कंधार तालुक्यातील सामान्य नागरिकांच्या प्रलंबित समस्यांची उकल यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.या जनता दरबारातून शेकडो नागरिकांनी आपल्या समस्या मांडून न्याय मागीतला.या जनता दरबारात तहसील,पंचायत समिती,नगरपालिका यासह विविध शासकीय कार्यालयातील समस्या नागरीकांनी मांडल्या.
लोकप्रतिनिचे कंधार तालुक्यातील जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.येथील कोणत्याही अधिकाऱ्यावर लोकप्रतिनिधीचा वचक नसल्याने अधिकारी व कर्मचारी यांचा मनमानी कारभार सुरू आहे.कंधार तालुक्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शुल्लक काम सुध्दा वेळेवर होत नाही .नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम आमदार,खासदार व इतर लोकप्रतिनिधी यांच्या कडून होणे आवश्यक आहे.परंतू तसे घडत नसल्याने सामाजिक बांधिलकी व देशसेवा म्हणून माजी सैनिक संघटनेच्या वतीने जनता दरबार भरविण्याची सुरुवात करण्यात आली.यानंतर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जनता दरबार भरविण्यात येणार असल्याची माहिती माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी दिली.
या जनता दरबारातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आनंद नवघरे,अर्जुन कांबळे,शेख अजिज,उमाजी पंदलवाड,जयश्री मम्मीलवार,सुभाष वडजे,संग्राम जायभाये यांच्या सह माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.