जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नांदेडात रॅली

नांदेड दि. 31 :- संपूर्ण जगात जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून 31 मे रोजी साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा सामान्य रुग्णालयातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष आणि इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज रॅली आयोजित करण्यात आले होते. सर्व शासकीय रुग्णालयात तंबाखू व्यसन मुक्ती केंद्र असून तेथे तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. व्यसन करणाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले.

या रॅलीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संतोष शिरसीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हनमंत पाटील, डॉ. एच. टी. साखरे, प्राचार्य रेणुकादास मैड, जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, समुपदेशक गजानन गोरे, नागेश अटकोरे तसेच शासकीय परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षक श्रीमती अपर्णा जाधव, श्रीमती राजेश्वरी देशमुख, विद्यार्थिनी आणि इंडियन डेंटल असोसिएशन चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

तंबाखू व्यसन हे मृत्युच्या प्रमुख कारणांपैकी एक असून त्याचे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. त्यापैकी तोंडात सर्वप्रथम लक्षणे दिसून येतात. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या मार्फत आज 31 मे रोजी सर्व नोंदणीकृत डेंटल दवाखान्यात मोफत तपासणी शिबीर ठेवण्यात आले होते. पुढील 15 दिवस कर्करोग किंवा त्याआधीचे लक्षणाबाबत तपासणी सर्व डेंटल दवाखान्यात मोफत राहील असे इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पांडूर्णीकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *