भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील धान खरेदी भ्रष्टाचार प्रकरणी एसआयटी नेमण्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे आदेश
मुंबई दि. २७
भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपुर जिल्ह्यात धान खरेदीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. बोगस ७/१२ दाखवून शेतकऱ्यांना मिळणारे धानासाठीचे अनुदान लाटण्याचा प्रकार अतिशय गंभीर असून यासंदर्भात तातडीने विशेष चौकशी पथक (SIT) स्थापन करण्यात येऊन दोषींना कठोर शासन करण्यात यावे,असे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिले.
यासंदर्भात विधानभवन, मुंबई येथे आयोजित उच्चस्तरीय बैठकीस भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विश्वजित कदम तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील, गृह, पणन आणि आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक, भंडारा यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार आरोपींनी आदिवासी विकास महामंडळ, उप प्रादेशिक कार्यालय, देवरी येथे आधारभूत खरेदी योजने अंतर्गत नियमबाह्य धानाची वाहतूक करून तसेच बोगस कागदपत्रे बनवून महामंडळाची फसवणूक केलेली आहे. गोंदिया जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामामध्ये सन 2019 व 2020 मध्ये धान खरेदीत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
गडचिरोली येथेही धान खरेदी पणन हंगाम सन 2018-2020 मध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे. बोगस 7/12 दाखवून शेतकऱ्यांचे अनुदान लाटणे, मृत्यू झालेल्या वा शेत जमीन नसलेल्यांच्या नावे अनुदान घेणे, वन विभागाच्या जागेत धान शेती लागवड झाल्याचे दाखवून अनुदान उचलणे, इ.गंभीर प्रकार या जिल्ह्यांमध्ये उघडकीस आले आहेत.
खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात गैरव्यवहाराचे प्रकार झाले आहेत. शेतकऱ्यांशी संबंधीत या संवेदनशील प्रश्नी दोषींना कडक शासन झाले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका विधानसभा अध्यक्ष, मा.श्री.नाना पटोले यांनी घेत यासंदर्भात सखोल चौकशी व्हावी आणि आरोपींची साखळी जेरबंद व्हावी, यासाठी विशेष चौकशी पथक (SIT) स्थापन करण्यात यावे, असे निदेश दिले.Attachments area