कंधार; विनोद तोरणे
कंधार तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र संततधार पणे जोरदार पाऊस होत आहे.त्यामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत सापडला आहे.काढणीस आलेल्या मूग पिकांसह कापूस,उडीद, तूर, सोयाबीन या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आणि मूग पिकाचा तर हातात आलेला घास शेतकर्यांच्या हातून गेलेला आहे.
प्रशासनाच्या वतीने योग्य दखल घेऊन कंधार तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशा मागणीचे निवेदन कृषी पदवीधर युवा शक्ती संघटना ,कंधार तालुक्याच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे नायब तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्फत सादर करण्यात आले. कंधार तालुक्यात गेल्या आठवड्यापासून संततधारपणे जोरदार पाऊस झाला त्यामुळे काढणीस आलेल्या मूगाचे पीक शेतकर्यांच्या हाती लागले नाही. संततधार पावसाने मूगाला अंकुर (मोड) फुटले. दरम्यान दोन दिवसाच्या विश्रांती नंतर पुन्हा कंधार परिसरात पाऊस झाला. सततच्या पावसाने पिकावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे.
सध्या सोयाबीन पिकावर उंट,लष्करी अळीचा मोठ्याप्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे. बहुतांश ठिकाणी सोयाबीन पिकाच्या शेंगांना बुरशीचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे शेंगा परिपक्व होण्यापूर्वीच वाळून जात आहेत. सततच्या पावसाने मूगाचे पीक पूर्णपणे वाया गेले आहे. तसेच अन्य पिकाचे भवितव्य अधांतरी आहे. नुकसान ग्रस्त शेतकर्यांना तातडीने मदत करावी व तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी कृषी पदवीधर युवा शक्ती संघटना कंधार च्या वतीने करण्यात आली आहे.
जिल्हा अध्यक्ष किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदनावर कंधार तालुका कार्याध्यक्ष श्री योगीराज स्वामी सह अध्यक्ष श्रीकांत मुसांडे , उपाध्यक्ष कृष्णा भालेराव, संघटक विश्वा कल्याणकर आणि बाळासाहेब जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.