कंधार :(विश्वांभर बसवंते)
कंधार ग्रामीण रुग्णालयातील मयत कर्मचारी यांची वेतन पडताळणी साठी पाठवण्यात आलेली मुळ सेवा पुस्तिका छत्रपती संभाजीनगर येथील वेतन पडताळणी कार्यालयात कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या सही शिक्याचे बनावट पत्र देवून, मयत कर्मचाऱ्याच्या भावानेच सेवा पुस्तिका हस्तगत केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. शासनाची फसवणूक केल्याची तक्रार करूनही कंधार पोलिसांकडून या संदर्भात कारवाई केल्या जात नसल्याने वैद्यकीय अधीक्षकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
कंधार ग्रामीण रुग्णालयात कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत असलेले सतीश रामराव कल्याणकर यांचे दि.२४ जुन २०२२ रोजी निधन झाले. वेतन निश्चिती करिता मयत कर्मचारी सतीश कल्याणकर यांची पत्नी ममता कल्याणकर त्यांचा मुलगा तसेच मयताचा भाऊ दिलीप रामराव कल्याणकर यांनी सर्व कुटुंबासोबत कंधार ग्रामीण रुग्णालयात येवून विनंती अर्ज देवून मयत सतीश कल्याणकर यांची मुळ सेवा पुस्तिका घेतली व यानंतर कल्याणकर कुटुंबाने छत्रपती संभाजीनगर येथील वेतन पडताळणी कार्यालयात जावून कंधार ग्रामीण रुग्णालयाचे दि.२५ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या पत्रा सह ही सेवा पुस्तिका वेतन निश्चिती करिता वेतन पडताळणी कार्यालयात सादर केली.
त्यानंतर पुढील कार्यवाही साठी लागत असलेल्या सेवा पुस्तिका मिळवण्यासाठी काही दिवसांपूर्वी ग्रामीण रुग्णालयाने छत्रपती संभाजीनगर येथील वेतन पडताळणी अधिकारी यांच्या कार्यालयात जावून चौकशी केली असता, मयत कर्मचारी सतीश कल्याणकर यांचे भाऊ दिलीप कल्याणकर (सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक हदगाव उपजिल्हा रुग्णालय) यांनी कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या नावाचा खोटा शिक्का व खोटी सही केलेले व दि.१३ जानेवारी २०२३ रोजी पारित केल्याचे बनावट पत्र वेतन पडताळणी कार्यालयास देवून दि.१६ जानेवारी २०२३ रोजी मयत सतीश कल्याणकर यांचे मुळ सेवा पुस्तिक हस्तगत करून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर यांनी दि.१० मे रोजी कंधार पोलिसात करून दिलीप कल्याणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
मात्र कंधार पोलिसांनी या संदर्भात कुठलीच कारवाई केली नसल्याचे सांगत वैद्यकीय अधीक्षक डॉ.लोणीकर यांनी कंधारचे पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच शासनाची फसवणूक करून मयत भावाची हस्तगत केलेली सेवा पुस्तिका दिलीप कल्याणकर यांनी आज तगायात आपल्या जवळच ठेवल्याने मयत कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीस व त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देणे शक्य होत नसल्याचे म्हटले आहे. त्यासाठी सदरील सेवा पुस्तिका मिकवून देण्याची ही मागणी वैद्यकीय अधीक्षक डॉ.लोणीकर यांनी तक्रारीत केली आहे.