Post Views: 49
नांदेड – आषाढ पौर्णिमेनिमित्त तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात पौर्णिमोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने १९ जुलै रोजी प्रभात नगरातील पंचशील महिला मंडळाच्या पुढाकाराने भोजनदान व सकाळपासूनच विविध कार्यक्रम संपन्न होणार असून बौद्ध उपासक उपासिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांच्यासह भिक्खू संघाने केले आहे.
पौर्णिमोत्सव कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बोलतांना ते म्हणाले की, बौध्द धम्मामध्ये आषाढ पौर्णिमेला विशेष महत्व आहे. कारण या दिवशी भगवंताच्या जीवनातील अनेक घटना याच दिवशी घडल्या आहे. त्यापैकी पहिली घटना म्हणजे महामायेला गर्भधारणा झाली. दूसरी घटना म्हणजे भगवंतानी सारनाथ या ठिकाणी पहिले धम्मचक्र प्रवर्तन करून आपल्या पाच शिष्याना प्रथम धम्मोपदेश दिला. त्यामुळे या शिष्यानी भगवंताला आपले गुरु मानले. म्हणून ही पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. तिसरी घटना म्हणजेच याच दिवशी भिक्खू संघाची स्थापना झाली. अशा अनेक महत्वपूर्ण घटना संयोगाने याच दिवशी घडल्या आहेत.
तसेच वर्षावास परंपरेला देखील धम्मामध्ये अतिशय महत्व असून ही बुध्दकाळापासून चालत आलेली परंपरा आहे. याचे महत्व स्वतः तथागत भगवान बुध्दांनी अनेक ठिकाणी वर्षावास करून पुजनीय भिक्खू संघ व श्रद्धावान उपासकांच्या समोर आदर्श ठेवला आहे. या दिवशी आषाढ पौर्णिमेला जगभरातील पुजनीय भिक्खू संघाकडून वर्षावासाला प्रारंभ करण्यात येतो. ह्या वर्षावासाचा कालावधी हा आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा असा तीन महिन्यांचा असतो. त्यामुळे हे तीन महिने सर्वत्र प्रत्येक बुध्दविहारात विपश्यना (ध्यानसाधना), त्रिरत्न वंदना, परित्राणपाठ, धम्मदेसना, बुध्द आणि त्यांचा धम्म या महान ग्रंथाचे वाचन, उपोसथ आदी. कृतिकार्यक्रम सुरु करण्यात येतात. या पार्श्वभूमीवर दिवसभर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तेव्हा सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले.