परभणी, दि.31 : नियतीचा खेळ काही अजबच असतो. बालपणी आई-वडीलांचे छत्र हरवते, बालके अनाथ होतात आणि श्वास घेत जगण्याची केविलवाणी धडपड सुरू होते. याच धडपडीला आपण जगणे म्हणत पुढे चालत राहतो. पुढे ही अनाथ बालकं कशी जगतात, आयुष्याचा गाडा कशाप्रकारे हाकतात, त्यांचे पुढे काय होते, त्यांचा सांभाळ कोण करते, याचा चार दिवसानंतर समाज म्हणून आपल्या सर्वांना अक्षरश: विसर पडतो. पण अशीच काही अनाथ बालके नियतीशी चार हात करत, जीवनगाणे गात पुढे यशस्वी होतात. आलेल्या विपरीत परिस्थितीशी दोन हात करत जिद्दीने जगलेल्या गंगाखेड तालुक्यातील माखणी येथील अशाच तीन सख्ख्या अनाथ भावंडांची ही यशकथा….! या तीन भावंडांच्या मदतीला धावून आले जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय…!
महिला व बालविकास विभागांतर्गत असणाऱ्या बालगृहामध्ये शिकलेल्या एकाच कुटुंबातील तीन अनाथ बालकांची २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या पोलिस भरतीत महाराष्ट्र पोलीस दलामध्ये निवड झाली आहे. महिला व बाल विकास विभागांतर्गत अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्र वितरित केले जाते. त्यांतर्गत बालकांना शासकीय नोकऱ्यांमध्ये एक टक्का आरक्षण दिले जाते. या आरक्षणामुळे अनाथ बालकांना नोकरीमध्ये थोडी आशा राहतो.
गंगाखेड तालुक्यातील माखणी येथील कृष्णा केशव शिसोदे (२४) आणि आकार केशव शिसोदे (दोघेही मुंबई शहर) तर ओंकार केशव शिसोदे (परभणी) अशी पोलीस दलात निवड झालेल्या भावंडांची नावे आहेत. ही तीनही भावंडे सुरुवातीला परभणीतील खानापूर फाटा येथील सागर बालक आश्रमामध्ये वाढली. नंतर पाथरी रोडवरील जिजाऊ ज्ञानतीर्थ येथे पुढील शिक्षण घेतले आणि नंतर पुण्यातील आफ्टर केअर होम येथे राहून ११ ते पदवीचे शिक्षण घेत आज शासकीय सेवेत पोलीस दलात रुजू होत आहेत.
आकार आणि ओंकार ही दोन जुळी भावंडे आहेत. दोघेही २१ वर्षे पूर्ण करून आता पोलीस दलात रुजू होत आहेत. या तिन्ही भावंडांपैकी ओंकारची परभणी पोलीस दलात निवड झाली असून, तो सध्या धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेत आहे. तर राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रवेश पूर्ण झाले असल्यामुळे उर्वरित दोघांना नंतर बोलावले जाणार असल्याचे आकार शिसोदेने सांगितले.
या तीनही भावंडाच्या आई-वडिलांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. पण त्यांनी परिस्थितीला खंबीरपणे तोंड देत, जिद्दीने मेहनत केली व आता त्यांची पोलीस दलात निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे संपूर्ण माखणी गावात आनंद साजरा केला जात आहे.
महिला व बालविकास विभागाच्या वतीने आम्हाला अनाथ प्रमाणपत्र मिळाल्याने आम्हा तिन्ही भावंडाची आज पोलीस म्हणून निवड झाली आहे. त्यासाठी जिल्हा महिला बालविकास अधिकारी परभणी कार्यालयाने खूप सहकार्य केले. – आकार शिसोदे
‘तीनही शिसोदे भावंडाच्या जिद्दीला सलाम व त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा’ परभणी जिल्ह्यातील इतर अनाथ बालकांनी अनाथ प्रमाणपत्राकरिता जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाची संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.