३१ महिन्यापासून राबवित असलेला कायापालट उपक्रमाचे ज्येष्ठ मनोविकार तज्ञ डॉ. दि.बा.जोशी यांनी केले कौतुक ..;संतांची शिकवण धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी आचरणात आणली

 

रंजल्या गांजल्याची सेवा करणे अतिशय अवघड असल्यामुळे नांदेडमध्ये संतांची शिकवण आचरणात आणणारे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर हे गेल्या ३१ महिन्यापासून राबवित असलेला कायापालट उपक्रमाचे करावे तितके कौतुक कमी असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ मनोविकार तज्ञ डॉ. दि.बा. जोशी यांनी केले. यावेळी ४० भ्रमिष्टांची कटिंग दाढी केल्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालून त्यांना नवीन कपडे, चहा फराळ व शंभर रुपये देण्यात आले.


खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपा नांदेड भाजप महानगराध्यक्ष , लायन्सचे योगेश जयस्वाल, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल अध्यक्ष ॲड.उमेश मेगदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेण्यात आलेल्या उपक्रमात ४० भ्रमिष्ठांचा कायापालट करण्यात आला.सकाळी ६ वाजल्यापासून शहरातील विविध भागातून भ्रमिष्ट, कचरा वेचणारे, अपंग, बेघर नागरिकांना सुरेश शर्मा, कामकाजी सरोदे,महेश शिंदे,ॲड. चिरंजीलाल दागडिया,संजयकुमार गायकवाड यांनी स्वतःच्या दुचाकीवर बसवून आणले. स्वयंसेवक बालाजी खोडके यांनी सर्वांची काळजीपूर्वक कटिंग दाढी केली. बालाजी मंदिराचे महंत कैलासमहाराज वैष्णव यांच्या सहकार्याने स्नान करण्याची व्यवस्था करण्यात आली. कित्येक दिवस आंघोळ न करणाऱ्या या आभागी नागरिकांना स्वयंसेवक साई याने साबण लावून स्वच्छ पाण्याने मनसोक्त स्नान घातली. त्यानंतर नीता दागडिया, निलिमा भयानी,डॉ. दि.बा. जोशी, अविनाश भयानी यांच्या हस्ते सर्वांना अंडरपॅन्ट, बनियन व पॅन्ट शर्ट वाटप करण्यात आले. ही भ्रमिष्ट मंडळी कायापालट होण्यासाठी तयार व्हावी म्हणून नेहमीप्रमाणे शंभर रुपयाची बक्षिसी व चहा फराळाची व्यवस्था करण्यात आली.पूर्वीचे मळके कपडे,अवास्तव वाढलेले केस आणि नंतरची चकाचक करण्यात आलेली कटिंग दाढी व नवीन कपडे घातल्यामुळे उपेक्षितांचा झालेला कायापालट पाहून त्यांना स्वतःलाच नवल वाटत होते.हा अनोखा उपक्रम पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी सदिच्छा भेट दिली.दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कायापालट हा उपक्रम बालाजी मंदिर परिसरात राबविण्यात येतो.४ सप्टेंबर रोजी कायापालटचा ३२ वा उपक्रम घेण्यात येणार असल्यामुळे अशा प्रकारची बेघर व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती स्वयंसेवकांना द्यावी असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

(छाया : संजयकुमार गायकवाड )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *