कंधार तालुक्यातील फुलवळ व फुलवळ ग्राम पंचायत हद्दीत अवैद्य दारू विक्री चा महापूर दिवसागणिक वाढतच चालला असल्याने गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होऊन चक्क बरबाद होत असून सुदैवाने एकदाच मिळालेले सुंदर जीवन न जगताच नको त्या वयात जगण्याला मुकत आहेत. त्यामुळे आई-वडील , पत्नी-मूल यांचंही जीवन असाह्य होत आहे. त्यामुळे फुलवळ गावातील व फुलवळ ग्राम पंचायत हद्दीतील अवैद्य दारू विक्री तात्काळ बंद करा आणि होरपळत असलेल्या सुखी संसारांना नवजीवन द्या या मागणीपोटी येथील नारीशक्ती आता एकवटली आहे.
पण खरच येथील दारूबंद होईल का..? याबद्दल मात्र जनतेतून तर्कवितर्क वर्तविले जात आहेत.
फुलवळ हे जि. प. गटाचे राष्ट्रीय महामार्गावर आलेले मुख्य गाव आहे. ग्राम § प्रमाणित किंवा परवाना धारक एकही अधिकृत दारू विक्रेता येथे नोंदणीकृत नाही परंतु गावाच्या अवतीभवती बहुतांश ठिकाणी अवैद्य दारू विक्री चा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर झाला असून याचा परिणाम तरुण पिढीवर मोठ्या प्रमाणात होत आहे. आजपर्यंत अनेकांची घरे या दारूमुळे च चक्क बरबाद झाली असून अनेकांना आपला जीव ही गमवावा लागला आहे.
परंतु व्यसनाला आणि स्वभावाला औषध नसते असे जे म्हणतात ते खरेच म्हणावे लागेल. कारण अशा व्यसनाधीनतेत आपण व आपल कुटुंब किती बरबाद होत आहे आणि झाले आहे याचा विचारच कोणी करायला तयार नाही. पण अशा प्रकाराला कुठे तरी ब्रेक बसला पाहिजे या उदात्त हेतूने येथील चळवळीतील कार्यकर्ते नवनाथ बनसोडे यांनी गावभर दवंडी देऊन ता. २३ जानेवारी रोज मंगळवारी रात्री ७:३० वाजता नवीन गावठाण हनुमान मंदिर परिसरात एक बैठक आयोजित केली.
या बैठकीला प्रामुख्याने कंधार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लोणीकर , पोलीस उप निरीक्षक गोपाळ इंद्राळे , पोलीस हेड कॉनिस्टेबल संतोष काळे यांना निमंत्रित केले होते. हे सर्वजण आवर्जून हजर ही झाले. त्याच बरोबर सरपंच प्रतिनिधी नागनाथ मंगनाळे , पोलीस पाटील इरबा देवकांबळे , सेवा सहकारी सोसायटी चे माजी चेअरमन नारायणराव मंगनाळे , विद्यमान चेअरमन दत्ता डांगे , ग्रामपंचायत सदस्य चंदबस मंगनाळे , प्रवीण मंगनाळे , बालाजी देवकांबळे , विविध वर्तमानपत्राचे प्रतिनिधी तसेच गावातील जवळपास शंभर-दीडशे महिला , दोनशे च्या जवळपास पुरुष , तरुण ही उपस्थित होते. तेंव्हा प्रथमतः उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रास्ताविकात जेष्ठ नागरिक बी.आर. बनसोडे यांनी दारूमुळे किती व कसे नुकसान होत आहे आणि कितीतरी कुटुंब उध्वस्त झालेली उदाहरणे देत गावकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. त्यानंतर आनंदा पवार , सदाशिव पटणे , नवनाथ बनसोडे , इरबा देवकांबळे , धोंडीबा बोरगावे सह अनेकांनी मत ″संसाराची या दारूमुळे कशी राखरांगोळी होऊन जातं आहे याबाबत भावना व्यक्त करून सरकार तुम्हीच आमचे मायबाप आहात तेंव्हा आम्हाला याचा पावबंद घालून द्या अशी केविलवाणी साद घातली. तेवढ्यातच आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या सौभाग्यवती सौ. आशाताई शिंदे यांनी व्हिडीओ कॉल द्वारे उपस्थित अधिकारी व गावकरी महिला-पुरुष यांच्याशी संवाद साधत अवैद्य दारू विक्री तात्काळ थांबवण्यासाठी महिलांना पुढाकार घ्या असे बळ देत मी आताच एसपी साहेबांशी चर्चा केली आहे तेंव्हा तात्काळ दारू विक्री ला आळा बसेल अशी खात्री देत कंधार पोलीस ठाण्यातील अधिकारी , कर्मचारी यांनी सुध्दा यावर नियंत्रण ठेवून दोषींवर कार्यवाही करावी असा निर्वाणीचा सल्ला दिला.
या सर्व घडामोडी नंतर वैतागून गेलेल्या आणि पेटून उठलेल्या महिला रणरागिणीपरी आक्रमक होत यापुढे जर गावात कोणी अवैद्य दारू विक्री करत असेल तर रीतसर पोलिस प्रशासनाला तसे कळवूच परंतु यावरही जर काही पर्याय निघाला नाही तर आम्ही नारीशक्ती आता गप्प बसणार नसून रस्त्यावर उतरून याकामी लढा उभारू असा निर्धार उपस्थित महिलांनी केला आहे.