श्रीरामच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली “
हे बावन्न वर्षांपूर्वी गायलेले गाणे आज सत्यात उतरले. खरंच आपण सर्वांनी हा सोहळा अनुभवत आहोत आणि जगत आहोत. हा सोहळा आपल्यासाठी चैतन्य आणि जल्लोष देणारा आहे. कारण राम जन्म होताना जणू काही आनंदाची वृष्टी करत होती, सर्व चराचर जसे की अत्यानंदाणे निरंजणे ओवाळीत होते, लता -वेली, झाडे, झुडपे, पाने, फुले आणि कळ्या सारे काही आनंदाने शहारून गेले होते.सर्व जलचर, मीन -मगर उभयचर असे सर्व प्राणीसृष्टी हर्षाने उत्फुल्ल झाले होते आणि त्याला कारणही तसेच होते कारण- या पृथ्वीतलावा वर एक ओजस्वी -तेजस्वी असे बाळ जन्मास आले होते, जे होते दशरथ नंदन आणि कौसल्या पुत्र राघव.
साक्षात परमेश्वरी अवताराला त्या थोर मातेने जन्माला घातले तेव्हा तिच्या संपूर्ण शरीरात एक नवचैतन्य संचारले असेल नाही का! सर या प्रसव वेतना क्षणात नाहीशा झाल्या असतील. त्याचे तेजस्वी रूप पाहून ती माता जणू काही अत्यानंदाने हुरळून गेली असणार.आजही राम जणू काही काही वर्षांपूर्वीच अगदी आत्ताच होऊन गेले आहेत असे वाटते. आजच्या भरकटलेल्या मुलांना आदर्श उदाहरण देण्यासाठी रामच आहे हा राघव संपूर्णतः यथार्थपणे मर्यादा पुरुषोत्तम होता.तो वडिलांचा पुत्र,पत्नीचा पती,प्रजेचा राजा या सर्व भूमिका पार पाडताना अत्यंत स्थितप्रज्ञतेने वागत असे.सावत्र आईच्या आज्ञेवरून वडिलांचा निरोप घेऊन वनवासात जाणारे रघुनंदन,
असो की पत्नीच्या विरहाने व्याकुळ झालेले राघव,बंधूंच्या प्रेमाने गदगदून गेलेले राम, सिंहासनावर विराजमान होताना पत्नीचा विरह सोसणारे रघुनंदन, स्वतःच्या पुत्रांशी युद्धाला सज्ज झालेले पुरुषोत्तम. या सर्व भूमिकांमधून त्यांनी केलेला प्रवास अवर्णनीयच आहे. या सर्व भूमिका त्यांनी अत्यंत शांत,निश्चय,स्थिर मनाने वठविल्या. साक्षात परमेश्वरी अवतार असलेल्या राघवाला जीवनामध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागले तेव्हा त्यांच्या प्रत्येक खडतर पाऊलवाटेवर त्यांना सोबत केली ती त्यांच्या रामानुज म्हणजेच लक्ष्मण आणि त्यांची सहचारिणी सीतेने. राम हे एक असे चरित्र आहे की आयुष्य जगताना त्याच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला जीवन जगायला शिकवतात जीवनात परमार्थाचा सुगंध पसरवून जातात. अत्यंत तेजस्वी ओजस्वी सामर्थ्य,मदनाला ही लाजवेल असे विलक्षण सौंदर्य, सर्व विद्यांमध्ये तरबेज, राजबिंड रूप लाभलेला असूनही हा राघव त्या मैथिलीच्या विरहात होरपळून निघाला परंतु इतर स्त्रीची कधीच त्यांनी इच्छा केली नाही. त्यामुळेच तो या वचनाचा हक्कदार आहे “एक वचनी एक पत्नी श्रीराम! यासारख्या ओजस्वी पुरुषाला जन्माला घालून धन्य झाले ते माता- पिता, याचे प्रेम सहवास लाभून हुरळून गेले ते बंधू, याच्या प्रेमाने त्यागाने न्याहून निघाली ते जानकी, याच्या सहवासाने स्वतःच्या आयुष्याला धन्य मानले त्या हनुमंताने, याच्या प्रेमळ उपदेशाने,आदेशाने भारावून गेले ते प्रजाजन म्हणूनच म्हणावेसे वाटते,”झाले बहु होतील बहु परि या सम हाच “
म्हणूनच तर आपण सर्वजण या रामाच्या आगमनाची त्याच्या देवालयाची चातकाप्रमाणे वाट पाहत होतो आणि ही प्रतीक्षा खऱ्या अर्थाने काल संपली.आपण सर्वांनी हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला. सर्वच वातावरण राममय झाले आहे. पण हा जल्लोष, ही आतुरता म्हणजेच राम आहे का?तर नाही तर राम म्हणजे काम, क्रोध,दंभ यांना मुळासकट उपटून टाकणारा, राम म्हणजे सत्य,राम म्हणजे शांतता,राम म्हणजे अहिंसा( भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी या न्यायाने वागणारा), राम म्हणजे सात्विकता, राम म्हणजे स्त्री सन्मान, राम म्हणजे स्वतःतील स्वाभिमान, राम म्हणजे स्वावलंबन,राम म्हणजे कृतिशीलता, राम म्हणजे नवचेतना- ऊर्जा.
म्हणूनच आपण सर्वांनी हा ऐतिहासिक क्षण जपण्यासाठी राम जगावा,राम जपावा आणि अनुभवावा तरच रामलल्लाच्या आगमनाला खऱ्या अर्थाने अर्थ येईल आणि तेव्हाच हा रामराया अगदी खरंच असा दिसेल (आजच्या या कलियुगात देखील )
“दास रामनामी दंग -राम होई दास “
रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम
श्री राम जय राम जय जय राम
सौ. भाग्यश्री अभिजीत जोशी -लालवंडीकर,
कंधार. 🙏🙏