Post Views: 82
नांदेड – लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्हाभरात मतदान जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शाळा, महाविद्यालये तसेच स्वीप द्वारे मोठ्या प्रमाणावर मतदान जनजागृती करण्यात येत आहे. मताधिकार बजावण्याबाबत लोकांमध्ये कमालीची उदासीनता दिसून येते. लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमीच असते. ती वाढावी यासाठी कसोशीने प्रयत्न केले जातात. जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीसाठी कंबर कसली आहे. चित्रात रंग भरुन ते गावातील लोकांसमोर जात आहेत.
नांदेड दक्षिण मतदारसंघातील जवळा देशमुख येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संतोष घटकार तसेच मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर, उमाकांत बेंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यां चित्र आरेखनात रंग भरुन गावभर मतदान करण्याबाबत मतदारांना आवाहन करीत आहेत. व्होट फॉर डेमोक्राॅसी हा नारा देत लोकशाही बळकट करण्यासाठी लोकांच्या घोळक्यासमोर जाऊन स्री पुरुष तसेच नवमतदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. शाळा स्तरावर मतदान जनजागृतीसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांनी सांगितले.