नांदेड-
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ह्या मंगळवारी दि. १५ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेत येणार असल्याची कुणकुण लागली असून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची यंत्रणा कामाला लागली असल्याचे सांगितले गेल्याबाबतची बातमी येथून प्रकाशित होणाऱ्या एका मराठी दैनिकाने प्रकाशित केली आहे.
बातमीत म्हटले आहे की, कोरोना विषाणूजन्य आणि संसर्गजन्य आजाराने संपूर्ण राज्याला ग्रासले आहे. कोरोनाजन्य आजाराची संसर्गसाखळी तुटावी तसेच विद्यार्थ्यांना या आजाराची लागण होऊ नये म्हणून राज्यातील सर्वच शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. तरीही आॅनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु ते शंभर टक्के यशस्वी झाले नाही. येत्या काळात अनलाॅकमध्ये शाळा सुरु करता येईल का, विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने चाचपणी सुरु केली आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दोन पथकांची नेमणूक केली होती. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री तथा हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड जिल्ह्यात येणार असल्याची माहिती मिळाली असली तरी त्या कशासाठी येताहेत याबाबत शिक्षण विभागाला कसलीही कल्पना नसल्याचे दिसून आले.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड मंगळवारी जिल्हा परिषदेत आल्यानंतर शिक्षण विभागाची आढावा बैठक घेणार आहेत. बैठकीत काय विचारतील ह्याबाबतीतही कुणालाही काही माहिती नाही. याबाबत शिक्षणविभाग अनभिज्ञच आहे. नांदेड दौऱ्याबाबत तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून कोणती माहिती मागवली जाणार यासंदर्भात अधिकृत पत्र शिक्षण विभागाला मिळाले नसल्याने जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना कोडेच पडले आहे. तसे पत्र प्राप्त झाले असते तर माहिती संकलन करणे सोपे झाले असते. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची बीटनिहाय संवाद कार्यशाळा सुरु आहे. यातून आॅनलाईन शिक्षणाबाबत माहिती संकलित केली जात आहे. शिक्षण विभाग त्यांच्याकडे असलेल्या उपलब्ध माहितीनुसार शिक्षणमंत्र्यांना सामोरे जाण्याची शक्यता आहे.