धर्माबाद :-
येथील हुतात्मा पानसरे हायस्कुलमध्ये सन 1993 मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून आपल्याच सोबत शिकत असलेल्या दिवंगत झालेल्या गरीब मित्राच्या परिवारास मदतीचा हात म्हणून आर्थिक स्वरूपात मदत देऊन माणुसकी जागविण्याचा प्रयत्न केला आहे. 1993 मध्ये हुतात्मा पानसरे शाळेत दहावीचे अ, ब, क आणि ड असे एकूण चार तुकड्या होत्या.
प्रत्येक तुकडीत साधारणपणे 60 विद्यार्थी होते. दोनशेच्या वर विद्यार्थी एकाच वर्गात शिक्षण घेऊन बाहेर पडले. कोणी डॉक्टर झाले, कोणी इंजिनिअर झाले, कोणी शिक्षक झाले तर कोणी जमेल ते व्यवसाय किंवा शेती करू लागले. या ग्रुपमधील विद्यार्थी सध्या देश विदेशात विखुरलेले आहेत.
सर्वचजण आपापल्या ठिकाणी स्थिरस्थावर झाले आहेत. सत्तावीस वर्षानंतर गेल्या वर्षी याच सप्टेंबर महिन्यात 22 तारखेला व्हाट्सअप्पच्या निमित्ताने वर्गमित्रांचे गेटटूगेदर झाले व सर्वांची भेट झाली. या भेटीतून 18 जानेवारी 2020 रोजी पहिली मदत देण्यात आली हाती. सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून परत एकदा त्यांचे वर्ग भरायला सुरुवात झाली. सर्वांचा परिचय एकमेकांना झाला. त्यात प्रत्येकांची सुख-दुःख देखील कळाले.
सोबतच्या काही वर्गमित्रांचा अकाली निधन झाल्याने त्यांचा परिवार सध्या खूपच दुःखात आणि अत्यंत कष्टात जीवन जगत आहेत. कोव्हीड महामारीमुळे त्या परिवारावर अजून भीषण संकट निर्माण झाले आहे. अशी माहिती एका मित्राने समूहात सर्वाना सांगितली. लागलीच सर्व मित्रांनी ज्यांना जेवढे शक्य होईल तेवढी रक्कम देऊ केली. जमा झालेले पैसे गोळा करून त्या परिवाराला आर्थिक मदतीचा हात देण्याचा विचार समोर आला.
काही दिवसांत समुहात एक लाख वीस हजार नऊशे रु. जमा झाले. दोन वर्ग मित्रांच्या कुटुंबाला हे आर्थिक मदत देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले आणि कसल्याही प्रकारचा गाजावाजा न करता त्या कुटुंबाला आर्थिक मदत देऊन सर्व मित्र मोकळे झाले.
त्याच सोबत श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार द्वारे संचालित प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेत त्यांच्या कुटुंब प्रमुखांच्या नावे 170 रु. देखील भरण्यात आले. ज्याचा फायदा वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना प्रति माह तीन हजार रु. पेंशन मिळत राहील.
असे म्हणतात की, उजव्या हाताने दान केलेले डाव्या हाताला कळू देऊ नये यातच खरा दान असतो, याचीच प्रचिती यानिमित्ताने पाहायला मिळाली. या सामाजिक उपक्रमामुळे हुतात्मा पानसरे हायस्कुल मधील 1993 या वर्षातील विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.