दापका राजा येथील सहशिक्षक चंद्रकांत तेलंगे यांनी समाजापुढे ठेवला एक अनोखा आदर्श
मुखेड: (दादाराव आगलावे)
तालुक्यातील दापका (राजा) येथील संत नामदेव विद्यालयाचे सहशिक्षक चंद्रकांत तेलंगे यांनी आपल्या बहिणीची परिस्थिती बेताची असल्यामुळे तिला शिरूर ताजबंद येथे दोन मजली घर बांधून देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
वडिलांनी बांधलेलं घर संघर्षातून वाटून घेतलेली अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील पण दोन्ही भावांनी मिळून घरं बांधून बहिणीला सप्रेम भेट करणं हे क्वचितच प्रसंगी पाहावयास मिळते. त्यापैकीच मुखेड तालुक्यातील राजा दापका येथील चंद्रकांत तेलंगे व विजयकांत तेलंगे या बंधूंनी शिरूर येथे दिनेश पांडुरंग तेलगाने यांच्याशी विवाहबद्ध झालेली बहिण सौ. मीना यांना दोन मजली घर बांधून सप्रेम भेट देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. दिनेश पांडुरंग तेलगाने हे अनेक वर्षापासून नोकरीच्या शोधात होते परंतु त्यांना नोकरी न मिळाल्यामुळे ते सुशिक्षित बेकारच राहिले. विवाहानंतर त्यांना ममता, शिवानी व पियू या तीन मुली झाल्या. मुलगा नसल्याने परिस्थिती जेमतेम असल्यामुळे सौ.मीना व दिनेश यांच्या चिंतेत वाढत होऊ लागली. चंद्रकांत तेलंगे गुरुजी यांचे वडील व्यंकटराव दिगंबर तेलंगे व आई सौ.दैवशाला तेलंगे व भाऊ विजयकांत तेलंगे यांनी आपल्या बहिणीला राहण्यासाठी घर नाही आपण त्यांना घर बांधून सप्रेम भेट देऊया असा विचार केला व केवळ आठ ते नऊ महिन्यात त्यांनी शिरूर ताजबंद येथे मीनाच्या सासरी दोन मजली टोलेजंग इमारत उभारून वास्तूची विधीवत पूजा करून घराची चावी सुपूर्द केली.
एकीकडे बहिणीच्या घरी कार्यक्रम असला म्हणजे आहेर घेऊन जाण्यासाठी भावा-भावात तंटे निर्माण होतात परंतु या दापका राजा येथील तेलंगे परिवाराच्या कार्यामुळे समाजामध्ये एक नवीन आदर्श पायंडा पडला आहे. सौ. मीनाच्या स्वप्नातलं एक सुंदर घर दापका (राजा) येथील माहेरच्या मंडळींनी उभारलं आणि त्यांच्या पिलांना एक भक्कम छत्र देवून कर्तुत्व सिद्ध केलंय. त्यांनी मीनाला व तिच्या सासरच्या मंडळींना पत्र्यातून बंगल्यात नेलंय.
तेलगाने परिवार स्वकर्तृत्वातून यापुढे भविष्यात या बंगल्यातून महालात जातील परंतु तेलंगे परिवारांनी सप्रेम भेट दिलेली वास्तू त्यांच्या स्मरणामधून कधीही पुसटशी होणार नाही यात मुळीच शंका नाही असे जाणकारातून ऐकावयास मिळत आहे. चंद्रकांत व विजयकांत या आदर्श भावंडाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.