लासलगाव ; प्रतिनिधी
येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दरवर्षाप्रमाणे मराठी विभागाद्वारे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य प्रा. भूषण हिरे, डॉ.सोमनाथ आरोटे तर वक्ता म्हणून प्रा.रामनाथ कदम उपस्थित होते. सोहळ्याची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. टाळ-मृदुंगाचा आवाज व ग्यानबा-तुकारामच्या जयघोषाने विद्यार्थ्यांच्या हर्ष उल्हासात महविद्यालयीन परिसर दुमदुमून गेला होता.
कार्यक्रम संयोजक डॉ.प्रतिभा जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी प्रा.भूषण हिरे यांनी मराठी भाषेची पूर्वपीठीका सांगत “मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ह्यासाठी अनेक वर्षे मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला गेला. त्यात प्रा. हरी नरके यांचे योगदान खूप मोठे आहे. तरुणाईने अधिक सजगतेने आपली मातृभाषा मराठीप्रती जागरूक होणे आवश्यक आहे तेव्हाच ती अधिकाधिक समृद्ध व सुदृढ होत जाईल. व्यवहारात मातृभाषेचा अधिकाधिक वापर व्हावा. भाषा संवादाचे सशक्त माध्यम आहे. त्यात प्रभावीपणे अभिव्यक्त होता येते. अधिकाधिक लेखन, वाचन, भाषण मराठीत झाले म्हणजे मातृभाषेच्या संवर्धनासाठी ते महत्वाचे ठरणार आहे.” अशी भावना व्यक्त केली.
त्याचप्रमाणे प्रमुख वक्ते डॉ.सोमनाथ आरोटे यांनी मराठी भाषा गौरवदिनानिमित्त सदिच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते मराठी विभागाच्या प्रतिबिंब हस्तलिखिताच्या ‘मराठी माझी मायबोली’ ह्या विशेषांकाचे प्रकाशन झाले. तसेच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित काव्यवाचन, निबंध, हस्तलेखन स्पर्धेतील विजेत्यांचा प्रमाणपत्र व ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. प्रा.प्रांजली ढेरे यांनी मराठी विभाग राबवीत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा घेत आभारप्रदर्शन केले. सूत्रसंचालन कु.रामेश्वरी लोहारकर व आदित्य पवार ह्यांनी केले. सदर कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उदंड असा प्रतिसाद या कार्यक्रमास लाभला.