मुखेड: (दादाराव आगलावे)
कै. सौ. भीमाबाई पांडुरंगराव पुंडे स्मृती, मातोश्री भीमाई व्याख्यानमाला व गुरुवर्य पांडुरंग पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा सोमवार दि. 10 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता शांतीनगर मुखेड येथे आयोजित केले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुसदचे ज्येष्ठ समाजसेवक प्रा. नारायणराव क्षिरसागर राहणार असून यावेळी नांदेड येथील ज्येष्ठ समाजसेवक एडवोकेट दिलीप ठाकूर यांना गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे. जागतिक दर्जाचे ससर्पदंश चिकित्सक मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे यांच्या संकल्पनेतून मातोश्री भीमाई व्याख्यानमाला सुरू आहे. त्याचे तेरावे पुष्प लातूर येथील सुप्रसिद्ध वक्ते प्रा. श्रीहरी वेदपाठक हे ‘तानतणावाचे व्यवस्थापन’ या विषयावर व्याख्यान पुष्प गुंफणार आहेत.
डॉ. दिलीपराव पुंडे यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त दि.11 नोव्हेंबर 2011 रोजी मुंबई येथील ज्येष्ठ कवी प्रा. प्रशांत मोरे यांच्या आई या विषयावर व्याख्यान संपन्न झाले व भीमाई व्याख्यानमालेचा युगारंंभ झाला. मागील एका तपापासून मुखेड व परिसरातील साहित्यिक व प्रेमींना व्याख्यानमालेचा लाभ मिळत आहे. व्याख्यानमालीचे दुसरे पुष्प ‘सुंदर जगण्यासाठी’ या विषयावर प्रा. डॉ. यशवंत पाटणे (सातारा) यांनी गुंफले. तिसरे पुष्प सातारा येथील डॉ. राजेंद्र पवार यांनी ‘सुजाण पालकत्व’ या विषयावर गुंतले. चौथे पुष्प ‘एकविसाव्या शतकासमोरील आव्हाने’ या विषयावर पुणे येथील प्रा. डॉ. तेज निवळीकर यांनी गुंतले. पाचवे पुष्प ‘ज्ञानदेवे रचिला पाया.. तुका झालाशी कळस’ या विषयावर डॉ. रामचंद्र देखणे पुणे यांनी गुंफले. सहावे पुष्प ‘शतायुष्य व्हा, पासवर्ड आरोग्याचा’ या विषयावर डॉ.अविनाश सावजी अमरावती यांनी गुफले. सातवे पुष्प डॉ. सचिन देशमुख औरंगाबाद यांनी ‘स्वभावालाही औषध असतं’ या विषयावर गुंफले.

आठवे पुष्प डॉ. जगन्नाथ दीक्षित औरंगाबाद यांनी ‘विनासायास वेट लॉस’ या विषयावर गुंफले. नवे पुष्प डॉ. श्रीराम राठोड व माजी आयुक्त आर. के. गायकवाड यांनी ‘विपश्यना परिचय व अनुभूती’ या विषयावर गुंफले. दहावी पुष्प प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे सातारा यांनी “जीवन त्यांना कळले हो’ या विषयावर गुंफले. अकरावे पुष्प इंद्रजीत देशमुख कराड यांनी ‘पसायदान’ या विषयावर गुंफले. 12 वे तपपुर्ती व्याख्यान डॉ. आनंद सूर्यवंशी व डॉ. गौरव पुंडे यांनी ‘हृदयरोग जनजागरण अभियान’ या विषयावर गुंफले तर आज दिनांक 10 मार्च रोज सोमवारी सुप्रसिद्ध वक्ते व विचारवंत प्रा. श्रीहरी वेदपाठक हे ‘ताणतणावाचे व्यवस्थापन’ या विषयावर गुंफणार आहेत. सदरील व्याख्यान पुंडे हॉस्पिटल जवळील शांतीनगर येथील भव्य प्रांंगणात होणार असून या व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे, सौ. माला पुंडे, डॉ. गौरव पुंडे, डॉ. तेजस्विनी पुंडे यांच्यासह भीमाई व्याख्यानमाला संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

