आपसातील वाद मिटवून 7 जोडप्यांनी एकत्र नांदण्याचा घेतला निर्णय
विविध प्रकरणात 25 कोटी 39 लाख 35 हजार इतक्या रकमेची तडजोड*नांदेड दि. 23 मार्च:- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस.जी. वेदपाठक यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा व सत्र न्यायालय, नांदेडच्या प्रांगणात शनिवार 22 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत 25 कोटी 39 लाख 35 हजार 78 रुपये इतक्या रकमेची तडजोड झाली.
या कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश 02, श्रीमती आर.आर. पटवारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज, अधिवक्ता संघाचे अध्यक्ष आशिष गोदमगावकर, जिल्हा सरकारी वकील रणजीत देशमुख तसेच नांदेड येथील सर्व सन्माननीय न्यायाधीश उपस्थित होते.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. वेदपाठक यांनी राष्ट्रीय लोकअदालतीच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित पक्षकारांना लोकअदालतीचे महत्व काय आहे याची जाणीव करुन दिली. लोकअदालतीमध्ये दोन्ही बाजुंच्या पक्षकारांना बोलण्याची पुरेपुर संधी मिळते. दोघांना मान्य असलेला तोडगा काढला जातो. ज्यामुळे दोघांनाही तितकाच आनंद आणि समाधान मिळत असते असे मार्गदर्शन केले व लोकअदालत ही एक संधी असून या संधीचा लाभ घ्यावा, असे उपस्थित पक्षकारांना आवाहन केले.
तसेच नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका न्यायालयात व कौटुंबिक न्यायालय, नांदेड येथे 22 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड जिल्हयामध्ये एकुण 7 हजार 558 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली असून 25 कोटी 39 लाख 35 हजार 78 (अक्षरी पंचवीस कोटी एकोणचाळीस लाख पस्तीस हजार आठ्याहत्तर केवळ) इतक्या रकमेबाबत विविध प्रकरणांत तडजोड झाली.
त्यामध्ये दिवाणी, फौजदारी, धनादेश अनादरीत झालेली प्रकरणे, बॅंक प्रकरणे, मोटार वाहन
अपघात नुकसानभरपाई, भूसंपादन, लोहमार्ग गुन्हा कबुली प्रकरणे, ग्रामपंचायतीचे घरपट्टी व पाणीपट्टीचे प्रकरणे तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय येथील प्रलंबीत प्रकरणांचा व नांदेड वाघाळा महानगर पालिका, पंचायत समिती व ग्रामपंचायतींचे वसुली प्रकरणे, विविध बॅंकांचे तसेच विद्युत प्रकरणे, दूरसंचार विभागाचे टेलिफोन, ट्रॅफिक चालन इत्यादींचे दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश होता. तसेच पाच दिवस घेण्यात आलेल्या विषेश मोहीमेअतंर्गत 794 प्रकरणे निकाली काढण्यात आले आहे.
विषेष म्हणजे या लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यातील पती-पत्नीचे कौटुंबिक वादाची एकूण आठ प्रकरणे आपसात तडजोडीने मिटविण्यात आली असून त्यापैकी 7 वैवाहिक दांपत्यांनी आपसातील वाद संपवून पुन्हा एकत्र येवून संसाराची सुरुवात करण्याचा निर्णय लोकअदालतीच्या माध्यमातून घेतला.या लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढून लोकअदालत यशस्वी करण्या साठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज मुख्यालयातील व तालुकास्तरावरील सर्व सन्माननीय जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश यांनी विशेष प्रयत्न केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये परिश्रम घेतलेल्या सर्व न्यायालयीन कर्मचारी वृंदांचे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार व्यक्त करुन यापुढेही अशाच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
00000