प्रतिनिधी, कंधार
——————–
तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कंधारच्या वतीने खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण (२०२५-२०२६) मंगळवारी, ६ मे रोजी सकाळी ११ वाजता सभागृह, तहसिल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणास अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले.खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानी कंधारचे तालुका कृषी अधिकारी भरत वाठोरे हे होते. या प्रशिक्षणास राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तथा प्रगतशील शेतकरी रत्नाकर ढगे पाटील, प्रगतशील शेतकरी कृष्णा भालेराव, कंधारचे मंडळ कृषी अधिकारी गोदाती काळे, बारुळचे मंडळ कृषी अधिकारी सुनील राठोड, कृषी अधिकारी कु.स्वाती टेळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेत कै.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रशिक्षणाचे प्रस्ताविक तालुका कृषी अधिकारी भरत वाठोरे यांनी करुन खरीप हंगामात करावयाच्या नियोजनाबद्दल जसे गावबैठकाव्दारे, बीजप्रक्रिया मोहीम, बीज उगवण क्षमता करणे, प्रत्येक शेतकऱ्यांनी जलतारा करावा, तसेच विविध कृषी विभागाच्या योजनांची माहिती गावबैठकामध्ये द्यावी, अशी माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तथा प्रगतशील शेतकरी रत्नाकर ढगे पाटील यांनी सेंद्रिय शेतीचे महत्व, फळबाग लागवड, जमिनीचे आरोग्य कसे सुधारावे, तसेच जमिनीतील कर्ब कशा पद्धतीने वाढवावा याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रगतिशील शेतकरी कृष्णा भालेराव यांनी माती परिक्षणाचे महत्व, बियाणे निवड, बियाणे विकत घेताना घ्यावयाची काळजी याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले.यावेळी प्रगतिशील शेतकरी अनिल मोरे, शंकर पाटील वडजे, नितेश कदम, प्रभाकर व्यवहारे आदींसह सर्व मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक संभाजी वडजे यांनी केले. तर आभार मंडळ कृषी अधिकारी एस.एस.गुट्टे यांनी मानले.

