जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला महावितरणच्या कामांचा आढावा ;मान्सूनपुर्व कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश

 

नांदेड, दि. 10 मे :- सध्या नांदेड जिल्ह्याचा पारा 43 अंशाच्या जवळपास असून हवेत प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यामुळे ग्राहकांची विजेची मागणी वाढली असून पुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे वारंवार विज पुरवठा बंद पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. याबाबत महावितरण विभागाने आवश्यक त्या उपाययोजना करुन विद्युत पुरवठा सुरळीत राहील यांची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात महावितरण विभागाच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अधिक्षक अभियंता सुधाकर जाधव, कार्यकारी अभियंता विनय बहादूर, रुमदेव चव्हाण, मंगेश बोरगावकर तसेच महावितरण विभागाच्या अधिकारी कर्मचारी आदीची उपस्थिती होती.

यावेळी मान्सूमपुर्व कामे प्राधान्याने करा, विजेच्या समस्याबाबत ग्राहकांशी, नागरिकांशी सुसंवाद ठेवा. उपकेंद्राची रोहित्र क्षमता वाढविण्याचे व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 तसेच इतर योजनेअंतर्गत उपकेंद्र रोहित्र वाढविण्याचे कामे प्राधान्याने पूर्ण करा. यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवा, ग्राहकांचे मोबाईल क्रमांक अपडेट करुन घ्या. उपकेंद्राची रोहित्र क्षमता वाढविण्याचे कामे 10 दिवसांत पूर्ण होतील यांची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच दुरुस्तीचे कामे करताना महावितरणने ग्राहकांची गैरसोय होणार नाही यासाठी मॅसेज पाठवून पुर्वसूचना द्यावी. यामुळे ग्राहकांच्या तक्रारी वाढणार नाहीत. तसेच दुरुस्तीच्या कामासाठी अद्ययावत यंत्राचा वापर वाढवावा. यासाठी आवश्यक त्या साहित्यांची खरेदी करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 725 गावे व 720 वाडीपाडे असून या गावामध्ये महावितरणद्वारे विद्युतीकरण झालेले आहे. तसेच जिल्ह्यात एकूण 6 लाख 29 हजार 147 विज ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांना उन्हाळयाच्या पार्श्वभूमीवर विज पुरवठा करताना विजेच्या मागणीनुसार पुरवठा कमी पडत आहे. त्यानुसार महावितरण विभागाकडून उपकेंद्राची रोहित्र क्षमता वाढविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे ही समस्या लवकरच सुटण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती महावितरणचे अधिक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी दिली. तसेच यावेळी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0, नवीन उपकेंद्रे मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजना प्रणाली सुधारणा, नवीन अतिरिक्त उपकेंद्र रोहित्र मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 प्रणाली सुधारणा , एबीडी योजनेअंतर्गत्तच्या प्रस्तावित कामांची माहिती, नवीन उपकेंद्रे, सुधारित वितरण क्षेत्र योजना, वाहिनी विलगीकरण उपाययोजना, सोलार प्रकल्प यातील प्रगतीपथावर असलेल्या कामांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
00000
Maharashtra DGIPR
विभागीय माहिती कार्यालय, लातूर
Collector Office, Nanded
DDSahyadri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *