येत्या 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपूर्ण देशात साजरा केला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी काही महत्त्वाचे हेतू डोळ्यासमोर ठेवून हा राज्याभिषेक करून घेतला. त्यात त्यांनी शेतकऱ्यांचे हित जाणले. लढाई करते वेळेस शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही स्पर्श होणार नाही, याची सैनिकांना तंबी दिली होती.परंतु आज शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. सहा सहा महिने शेतकरी आंदोलन करून सुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने न्याय मिळाला नाही. ही खेदाची बाब आहे. उठसूठ कोणीही शेतकऱ्यावर बोलून तोंड सुख घेत आहेत. भारत हा कृषिप्रधान देश आहे. या देशाला शेतकऱ्याची आणि सैनिकांची अत्यंत गरज आहे. तरच आपण सगळे गुण्यागोविंदाने येथे नांदू शकाल. त्यासाठी महाराजांनी जीवात जीव असेपर्यंत शेतकऱ्यांना आणि मावळ्यांना सांभाळले हे या ठिकाणी सांगावेसे वाटते.
पर्यावरणाच्या दृष्टीने सांगायचं असेल तर झाड वाळल्याशिवाय कोणीही तोडू नये. अशी सक्ती त्यांनी सर्वांना केली होती. आज जर पाहिलं तर सगळीकडे रस्ते तयार करण्यासाठी झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. हेही लक्षात ठेवणे आज गरजेचे आहे. आपल्या देशात सध्या फक्त 23 टक्के जंगल शिल्लक राहिलेले आहे. त्यामुळे आज तापमान 47अंश सेल्सिअस पर्यंत गेले आहे. आपले राज्य नीतीनेमाने चलावे. वडीलधाऱ्या व्यक्तींचा मान ठेवला जावा. सर्वांशी आपण आपुलकीने वागावे. बोलावे, म्हणून 6 जून 1674 रोजी शनिवारी काशीचे विद्वान पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते रायगडावर शिवराज्याभिषेक करण्यात आला. पाच नद्यांचे पाणी आणून सर्वांसमक्ष राज्याभिषेक सोहळा रायगडावर अतिशय आनंदाने पार पडला. महाराजांनी स्वराज्य स्थापने साठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले.
त्यामुळे शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.बालसंवगडी,मावळे , सरदार,आप्तस्वकीयांनी व बांधवांनी रक्त सांडले,तलवारीचे घाव सोसले,अनेक महिला विधवा झाल्या.अनेक तरुण लढाईत धारातीर्थी पडले या सगळ्यांचे दुःख पचवून महाराजांनी स्वतः 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक करून घेऊन रयतेचे राजे झाले. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती. असे सांगितले. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्तृत्वानुसार सन्मान दिला.कोणतीही जात, पात,
धर्म,पंथ पाहिले नाही,भेदभाव केला नाही,सर्व आपण समान आहोत. म्हणून अठरापगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. प्रत्येक माणसाची कर्तबगारी पाहून त्यांना तिथे कार्य करण्यास सांगितले. अनेक शत्रूच्या तावडीतून सुटून परकीयांच्या विरोधात मोहिमा काढून आपले हिंदवी स्वराज्य स्थापन केले. सध्याची परिस्थिती मी हे केले ? मी ते केले ?असे लोक सांगत आहेत. महाराजांनी कोणत्याही गडाला स्वतःचे नाव दिले नाही. कोणत्याही रस्त्याला,चौकाला
,शहराला आपले नाव दिले नाही.सध्याची परिस्थिती पाहता रात्रंदिवस लोक आपलं नाव छापून येण्यासाठी पुढे पुढे करत आहेत. अनेक जातीसमूह आपल्या आपल्या झेंड्याखाली वावरत आहेत.कोणता झेंडा घेऊ हाती म्हणण्याची वेळ सर्वसामान्य माणसावर आलेली आहे. दररोजच्या व्यवहारांमध्ये जात पाहून काही लोक कार्य करत आहेत.अनेक ठिकाणी लोकांना घर भाड्याने घेते वेळेस सुद्धा जात विचारली जात आहे. जातीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हे समूहाला, गटाला,मानव जातीला देशहिताला,राष्ट्रहिताला, धोकादायकच आहे.सर्वांनी आपण एक आहोत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, दक्षिण आफ्रिकेचे समाजसुधारक नेल्सन मंडेला हे जातीनुसार नसून परिश्रमाने मोठे झालेले महान व्यक्ती आहेत.
अशी एकजूट ठेवून कार्य केल्यास आपला देश भरभक्कम व बळकट होईल होईल. दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा, असे आपण गर्वाने म्हणतो.
या देशातील महिला शूरवीर आहेत.शूरवीरांचे आपण वारसदार आहोत.परंतु अलीकडच्या काळात जाती-जातीमध्ये लहान मोठेपणा आलेला आहे. महिलांविषयी अपशब्द काढले जात आहेत. महिलांना दुय्यम स्थान दिलं जात आहे.कर्तबगार महिलांना सुद्धा पाठीमागे ठेवले जात आहेत. काही तीर्थस्थळी महिलांना प्रवेश दिला जात नाही. अशामुळे महिलांचे खच्चीकरण होत आहे.अनेक शहरांची नावे बदलून इतर नाव ठेवण्यात अनेक मंडळी पुढे येत आहेत. असं जर होत असेल तर राष्ट्रहिताला अगोदर महत्त्व द्यावे. नंतर व्यक्ती निष्ठेला महत्त्व द्यावे. आजपर्यंतच्या समाजसुधारकांनी जात पाहिली नाही. प्रभूची लेकरे सारी म्हणून त्यांनी हे सगळं कार्य केले. परंतु वर्तमान स्थितीमध्ये कारखानदारी, व्यापारी संकुल, शहरातील चौक हे आपापल्या धर्मानुसार,जातीनुसार नाव देऊन अल्पसंख्यांकावर अन्याय होत आहे, त्यांच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही, त्यांची मुस्कटदाबी व दमछाक होत आहे. भयभीत वातावरण झालेले आहे.असं जर होत असेल तर देशाचे शकले उडतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले ते आपल्याला टिकवायचे आहे. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आपला देश पुढे जातो आहे, महाराजांनी परस्त्रीला मातेसमान मानले होते. ते आता आपण हळूहळू विसरत चाललो आहोत. रायगडावरुन खाली रात्रीच्या वेळी येणाऱ्या हिरकणीलाही त्यांनी सन्मानित करून पाठविले. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सुद्धा साडीचोळी देऊन परत पाठविले आहे.हा आपला प्रेरणादायी इतिहास सांगतो. त्यामुळे राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी आपण सगळेजण उत्सुक आहोत. राज्याभिषेकाच्या निमित्ताने महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेत आहोत. त्या अगोदर सर्वांची भाषा राष्ट्रीय एकात्मतेची असावी. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आपण तत्पर असावेत, कोणी लहान किंवा मोठा नाही याची जाणीव सर्वांना असावी.प्रसार माध्यमांनी सुद्धा सर्व जाती-धर्माच्या सुधारकांची
,क्रांतिकारकांची माहिती छापावी. कोणत्याही योजना असल्या तर सर्व समाजा पर्यंत पोहोचाव्यात
,जातीचे राजकारण जर आपल्या देशात घुसले तर त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतील. काही लोकांचा उदो उदो केला जातो. बाकीच्या लोकांना विचारले सुद्धा जात नाही. समाजामध्ये अशा घटना घडत आहेत.साधुसंतांनी एकात्मतेचा संदेश दिला. संत,महंत,तंत यांनी मानव धर्म शिकवला.संत नामदेव,संत कबीर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत कान्होपात्रा, संत चोखामेळा, संत गोरोबा कुंभार,संत जनाबाई, संत सोयराबाई,संत सावता माळी, संत एकनाथ,संत नरहरी महाराज,संत नरसी मेहता या सर्वांनी आपण सगळे एक आहोत. अशी शिकवण दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यामुळेच समानतेचा संदेश देण्यासाठी सर्वांसमक्ष राज्याभिषेक करून घेतला. त्या राज्यभिषेकाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपले वर्तन सुधारावे. जीवाला जीव देणारे एकनिष्ठ व्यक्ती महाराजांनी त्यांच्या काळात तयार केले होते. स्वराज्य हा त्यांचा जीव की प्राण होता.सेनापती हंबीरराव मोहिते,तानाजी मालुसरे,बाजीप्रभू देशपांडे, मदारी मेहतर, भंडारनायके,शेलार मामा, येसाजी कंक. शिवा काशिद या व्यक्तीनी जीवाची पर्वा न करता स्वराज्यासाठी आयुष्यभर झिजले. हे स्वराज्य रक्तानी न्हाऊन निघाले. सडा मांसाचा चिखल झाला होता. हजारो वीर स्वराज्यसाठी बलिदान दिले. फितुरी करणाऱ्यांना कडक शासन महाराजांनी केले.फितूरी हा आपल्या समाजाला लागलेला कलंक आहे. खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ यांना कडक शासन केले.अनेक कर्तबगार व्यक्तींना आपल्याच जवळच्या लोकांनी पैशाच्या आमिषाला बळी पडून लपून छपून बसलेले ठिकाण दाखवले आहेत. त्यात तात्या टोपे,उमाजी नाईक यांचा हकनाक बळी गेला आहे. इंग्रज, फ्रेंच, सिद्धी,मोगल,पोर्तुगीज,डच या सर्वच परकीयांना सळो की पळो करुन सोडले होते. ठकास महाठक म्हणून त्यांनी आपले कार्य पूर्णत्वाला नेले.सुरतेची बेसुरत केली.आदरयुक्त भीती महाराजांची सर्वांनाच होती. ताठ मानाने त्यांनी संपूर्ण जीवन जगले.जीवनात थोडी तडजोड ही केली. पुरंदरचा तह करून दोन पाऊल पाठीमागे आले, परंतु नंतर लागलीच पाठ फिरता संपूर्ण किल्ले जिंकून घेतले, कधीही शरणागती स्वीकारली नाही. हत्तीचं बळ असणाऱ्या माणसांना तयार केले .कुतुबशाही, इमादशाही, व-हाडशाही ,
मुघलशाही, निजामशाही या सर्वांना वठणीवर आणले, हर हर महादेवची गर्जना करून भगवा झेंडा फडकवला
म्हणून तर इंग्रजांचा प्रतिनिधी रायगडावर राज्याभिषेकाच्या वेळी जातीने उपस्थित होते. अशा प्रकारे महाराजांनी जे कार्य करून ठेवलेले आहे. त्या कार्याची आपण सगळ्यांनी स्मरण करावे.राष्ट्रीय एकात्मता दाखवावी. ज्यांचा समुद्र त्यांचे राज्य म्हणून महाराजांनी समुद्रावर अधिराज्य गाजविले ते आरमाराचे प्रमुख होते. परंतु अलीकडे ढिसाळ वातावरणामुळे इतर देशातील व्यक्ती मुंबईवर हल्ला केले हे बाब आपल्यासाठी भूषणावह नाही याची मनाला खंत वाटते.आपणही महाराजांसारखे शूरवीर व्हावेत, शत्रूला नामोहरम करावे,सत्याच्या बाजूने चालावे, परस्त्रीला मातेसमान मानावे,
पर्यावरणाचे रक्षण करावे. पर धर्मियांचा सुद्धा आदर करावा, कर्तृत्ववान व्यक्तीचा सन्मान करावा. शिवराई आणि होन यासारखे त्यांनी नाणी पाडले. शक हि कालगणना सुरू केली. राजमुद्रा तयार करून सर्वांना हे राज्य चंद्राच्या कलेप्रमाणे वाढावे असे प्रेरणा दिली. सध्याचे राजकारण अतिशय गढूड झाले आहे. पक्षांतर होऊन अनेक लोकांची निष्ठा कमी झाली आहे. असे जर होत राहिले तर महाराजांनी केलेला कार्य किती दिवस टिकेल याबद्दल मनात शंका निर्माण होते. महाराजांनी सर्व जाती धर्मांना एकत्रित केले .परंतु काही चतुर लोकांनी वेदोक्त प्रकरण काढून इतरांना कमी समजले असे होता कामा नये.वरील सर्व कार्य व्यवस्थित चालले तर आपल्याला महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण झाले असे म्हणता येईल.नाही तर स्वराज्याची शकले उडवून परकीय सत्ता भारतात येण्यास काहीच उशीर लागणार नाही. हे या लेखाच्या निमित्ताने सांगावे वाटते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने सर्वांना मंगलमय शुभेच्छा.शब्दांकन
प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपतराव
सदस्य: निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ. अहिल्यानगर.महाराष्ट्र राज्य

