हाफकिन संस्थेचा तपासणी, संशोधन आणि प्रशिक्षण याबाबतचा आराखडा येत्या ३ आठवड्यात सादर करा- वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश


मुंबई दि. 23 


 देशातील पहिली जीवशास्त्रीय संशोधन संस्था म्हणून हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्थेचा नावलौकिक आहे.: हा नावलौकिक टिकवून ठेवताना कोविड- 19 बाबतची राज्यातील परिस्थिती लक्षात घेता संस्थेचा तपासणी, संशोधन आणि प्रशिक्षण याबाबतचा आराखडा येत्या 3 आठवड्यात सादर करावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज दिले.
आज मंत्रालयात हाफकिन संस्थेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, हाफकिनच्या संचालक शैला ए, यांच्यासह हाफकिन संस्थेचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, हाफकिन संस्थेने सध्याची राज्यातील कोविड-19 परिस्थिती पाहता, तपासणी, संशोधन आणि प्रशिक्षण यावर अधिकाधिक भर देणे आवश्यक आहे. हाफकिन संस्थेने आजपर्यंत कॉलरा, रेबिज, सर्पदंश, विंचूदंश अशा अनेक रोगप्रतिबंधक लसी शोधून काढल्या आहेत. त्यामुळे कोविड -19 साठी लस शोधून काढण्यासाठी आवश्यक असलेले संशोधन येथे होणे आवश्यक आहे. आज राज्यभरात कोविड-19 साठीच्या तपासण्या शासकीय आणि खाजगी प्रयोगशाळेत करण्यात येत आहेत,परंतु हाफकिन संस्था तपासणीमध्ये प्रमुख मानली जाण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.आज हाफकिन संस्थेत तपासण्या होत असल्या तरी त्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे.
हाफकिन संस्थेने आतापर्यंत संशोधनात केलेले कार्य पाहता येणाऱ्या काळात संशोधनाची प्रक्रिया कशी असेल, संशोधन पद्धतीचा रोडमॅप कसा असेल याबाबतही आराखडा सादर करावा. तसेच हाफकिन संस्थेत कंत्राटी पध्दतीने संचालकपदाची भरती किंवा ॲड ऑन पद्धतीने पदभरती करताना, संचालक किंवा अधिकारी कर्मचारी यांना नियुक्ती देताना त्यांना देण्यात येणारी वेतनश्रेणी याबाबत सर्व नियम तपासून पाहावे असेही श्री.देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.#amitvdeshmukh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *