कंधार ; (दिगांबर वाघमारे )
घरकुल लाभ धारकांच्या रक्कम वितरणासाठी १५ डिसेंबरपर्यंत डिएसी सुरू करून कामकाज सुरु करण्याची मागणी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने आज पंचायत समिती कंधार कार्यालयात उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गट विकास अधिकारी यांच्या खुर्चीला ‘बेशरमचे हार’ घालून आंदोलन केले. यावेळी गटविकास अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने शिवसेना तालुकाप्रमुख परमेश्वर जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून पंतप्रधान आवास योजना, मोदी आवास व रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल लाभधारकांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. याबाबत वारंवार निवेदने, भेटी व पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
आजच्या आंदोलनादरम्यान पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भालचंद्र नाईक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा प्रतीकात्मक निषेध करुन भ्रष्ट गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे, घरकुलाचे पैसे मिळालेच पाहिजे, बिडिओचा करायचं काय अशा घोषणा देण्यात आल्या गटविकास अधिकारी यांचे कार्यालय बारा वाजले तरी कुलूप लावून गैरहजर असल्याने लाभधारकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला.
शिवसेनेच्या वतीने लवकरात लवकर डिएसी सुरू करून सर्व घरकुल लाभधारकांच्या खात्यावर रक्कम जमा करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी पंडितराव देवकांबळे, माजी सैनिक समितीचे बालाजी चुकलवाड, दादाराव शिंदे, विश्वनाथ पवार, सुनिता वडजे, व्यंकटेश सोनटक्के, लक्ष्मण कटवाड, रोहिदास शिराढोणे, आत्माराम लाडेकर, शिवाजी पाटील कदम, अच्युत मेटकर, नारायण वरपडे, जी एम पवळे, व्यंकट मुरकुटे यासह अनेक शिवसैनिक घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आंदोलनामुळे पंचायत समिती कार्यालयात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

