दरवर्षी पहिला सण म्हणून मकर संक्रांत सर्वत्र अतिशय आनंदाने साजरा केला जातो. सर्वांचाचे प्रेम मिळवण्यासाठी एकमेकांना तीळ गुळ घ्या.. गोड गोड बोला.. म्हणून तिळाचे आणि गुळाचे वाण एकत्रित करून आपल्या प्रियजनांना दिला जातो. थंडीच्या दिवसांमध्ये तीळ हे उष्णता वर्धक असते म्हणून ते आरोग्याला चांगले असते त्यासाठी दिले जाते हा वैज्ञानिक दृष्टिकोनाची जपणूक करणे ही आवश्यक आहे.
यावर्षी मनपा निवडणुका जवळ आलेल्या असल्यामुळे आपल्या मतदारांना भेटण्यासाठी प्रतिनिधी तिळगुळ घेऊन प्रत्येकाच्या दारात जात आहेत. त्यामुळे तिळाचे भाव जास्तीत जास्त वाढलेले दिसून येत आहे त.यात सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागली आहे.
आपले गावरान तीळ कमीत कमी वापरले जातात. आणि रेडिमेड तिळांचा जिकडे तिकडे वापर केला जात आहे. तयार असलेले लाडू रेवड्या, घेण्याचा कल महिला जास्तीत जास्त करीत आहेत .
कारण त्या नोकरी करणाऱ्या असल्यामुळे त्यांना घरी तयार करण्यासाठी पुरेसा वेळ नाही-
आधुनिक काळातील जास्तीत जास्त महिलांनी एकत्रित येऊन एकमेकींना आधुनिक विचारांच्या संक्रांतीचे वाण घेऊन देऊन ती थाटामाटात साजरी करावी. गटा गटांनी महिला एकत्रित येऊन अनाथ आश्रम, गोरगरीब, पीडित, रंजले -गांजले यांना दैनंदिन लागणाऱ्या उपयोगी वस्तू देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवावे, आपल्या बाजूला असणाऱ्या विद्यालयातील गोर-गरीब, पीडित विद्यार्थ्यांना ग्रंथ रूपी भेट द्यावी, त्यामुळे समाजामध्ये शैक्षणिक वातावरण चांगले निर्माण होईल, विद्यार्थी शिकले की समाजात जागृता येईल, एकमेकीने साथ करून घरोघरी फिरण्या पेक्षा एकत्रित येऊन गरीब समाजाला पुढे आणून त्यांच्यात परिवर्तन करावे. विधायक कार्य हाती घ्यावे.आणि संक्रातीचे वाण वाटावे. संयुक्त कुटुंब पद्धती आज पर्यंत चालत आली होती. आता विभक्त कुटुंब पद्धती चालू आहे. घरच्याच लोकांना घरचे लोक बोलत नाहीत. आणि बाहेर वाण देण्यासाठी जातात. ही शोकांतिका आहे. स्वतःच्या घरामध्ये अंधार ठेवून इतरांच्या घरात दिवा लावण्यासाठी अनेक लोकांचा खटाटोप असतो. दुसऱ्याचं बाळ कडेवर घेऊन आपलं चालवत पायी घेऊन जाणे, ही आपल्या संस्कृती देत नाही,असं न होता मकर संक्रांत ही विधवा महिलांना घेऊन साजरी करावी. तेव्हाच आपल्याला आधुनिक स्त्री म्हणण्याचा हक्क आहे.विधवा महिला या सणामुळे दुःखी होतात. त्यांना समाजात मानाचे स्थान दिले जात नाही. ती त्यांची स्वतःची चूक नाही. या समाजातील रूढी,परंपरा, अंधश्रद्धा या सर्व विधवांच्या आड येतात. आणि त्यांचा आनंद हिरावून घेतात.आजही विधवांना हा सण आला की तोंड लपून बसण्याची वेळ येते.कारण कोणत्याही महिला त्यांच्या कडे सन्मानाने जाऊन त्यांच्या दुःखात सहभागी होत नाहीत. कुठेतरी कोणी तरी एक टक्का समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्या प्रथेला समाजाचा आणखीही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही.
त्यामुळे मकर संक्रांत ही फलदायी असावी. दु:ख दायी असू नये. अनेक महिला या मकर संक्रांतीच्या काळात अंगावर भारी साड्या, दागदागिने , बडेजाव पणा यामध्ये जातात. आणि इतर जणांचे मने दु:खावतात. तुम्ही मोठे आहोत.याचे आम्हाला दुःख नाही.पण
या देशाचे आपण सूज्ञ नागरिक आहोत.म्हणून त्यांच्यामध्ये समाजाविषयी आपुलकी निर्माण करण्याचं कार्य आधुनिक महिलांनी करावं.’प्लॅस्टिकच्या वस्तू एकमेकींना देणे, उपयोगात न येणाऱ्या वस्तूंचा घरामध्ये ढीग पडणे, चिनी मातीच्या वस्तू वापरणे या गोष्टी या काळात भारतीय संस्कृतीला चांगल्या वाटत नाहीत.
सुशिक्षित महिलांनी आधुनिक विचाराची कास धरावी. अंधश्रद्धा सोडून टाकाव्यात. यानिमित्ताने चांगले संकल्प करावेत.आपल्या सदनात छोटे छोटे कार्यक्रम ठेवून व्यसनाधीनता,पर्यावरण,मोबाईलचे फायदे तोटे ,साासू-सासर्यांची सेवा ,आई वडिलांची सेवा, बदललेल्या शैक्षणिक पद्धती, मुलांचे लाड, खाण्याच्या पद्धती,घटस्फोट या सर्व महत्त्वाच्या विषया वर विचार मंथन व्हावे.त्यावेळी समाज प्रगल्भ बनतो. मग ही परंपरा पुढे चालू राहील. परंतु आज मकरं संक्रांतीच्या निमित्ताने बाजारात अलोट गर्दी होऊन वस्तु रूप वाण देऊन घरात आणल्या जात आहे. त्यामुळे हसावे का बुद्धीची कीव करावी हे कळत नाही. आपला अमूल्य वेळ या कार्यक्रमात घालवणं संयुक्तिक वाटत नाही. हळदी कुंकू आधुनिक विचाराचं लावावं. कर्तृत्वाच कुंकू लेवावं पती-पत्नी मधील वैचारिक, सामाजिक , सांस्कृतिक, आध्यात्मिक संबंध दृढ करावेत. शंका कुशंका मनातील काढून टाकाव्यात.
एकत्रित बसून सर्वांनी भोजन करावं. एकमेकांमध्ये असलेले गैरसमज काढून टाकून आनंदाने तिळगुळ घेऊन गोड बोलून हा संसाराचा रथ पुढे चालवावा. पुरुषांनी महिलांना व महिलांनी पुरुषांना समजून घ्यावं. सध्या तरुणांचं ,तरुणींचं वय वाढत आहे. विवाह होत नाहीत यावर विचार मंथन करावं, आपल्या गरजा आवडीनिवडी मर्यादित करून घ्याव्यात समजून घ्यावं तरच स्थळ येईल आणि आपण विवाहित व्हाल नाहीतर फार मोठे अपेक्षा ठेवून आपण आपलं जीवन दु:खमय जगाल. आणि एकमेकांना विचाररुपी तिळगुळ देऊन सलोख्याचे वातावरण समाजात तयार करावं.
तेव्हा एकमेकांना तीळ आणि गुळ देण्याच्या विचारातून सुशिक्षित समाज एकरूप होईल. असे मला वाटते. आपल्या घरातील ग्रंथ ज्याला उपयोगी आहेत. त्यांना देऊन त्याचं दान करावं. असे आपले विचारसरणी आधुनिक ठेवावे.जेव्हा समाजात एकोपा निर्माण होईल. महिलांनी दररोजच्या दैनंदिन कामकाजातून आपला अमूल्य वेळ काढून मकर संक्रांत आधुनिक विचारांची पेरणी करावी.आपल्या संस्कृतीला शोभेल असेच कार्य करावे. दिवा स्वप्नामध्ये जाऊ नये. महिला कितीही मोठ्या झाल्या तर त्यांनी आपल्या उंबरठ्यावर आपली भक्ती ठेवावी. जसे झाड कितीही उंच वाढले तरी, त्यांनी आपल्याला जन्म देणाऱ्या मातीला विसरू नये. प्रत्येक गोष्टीची जाणीव ठेवली की समाज यशाच्या शिखरावर पोहोचतो. आज महिला सुशिक्षित झालेल्या असल्या तरी त्यांना अनेक उपवास, वैकल्ये,अंधश्रद्धा, पीडा ,शनि, नागबळी, आणि एक धार्मिक अंधश्रद्धा उलघडणाऱ्या यामध्ये गुरफटून गेलेल्या आहेत. त्यामधून बाहेर येणे काळाची गरज आहे. दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. सूर्य हा आजपासून तिळातिळानी मोठा होतो. असे भौगोलिक कारण आहे. सृष्टी चक्रामध्ये होणारा बदल मानवासाठी अतिशय उपयुक्त आहे. थंडीचे दिवस संपवून उन्हाळ्याची चाहूल लागते. सहा महिने उत्तरायाण आणि सहा महिने दक्षिणायन असते. बारा राशी पैकी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. 14 जानेवारी हा भूगोल दिन सर्वत्र साजरा केला जातो. या दोन तीन कारणाने खरोखरच हा सण प्रेरणादायी आहे त्यामुळे सर्व महिलांनी आधुनिक ते पद्धतीने फल जाई होईल अशा पद्धतीनेच मकर संक्रांत साजरी करावी व एकमेकींना रोपाचे वाण द्यावे. ही अपेक्षा.. तिळगुळ घ्या.. गोड गोड बोला.. मकरसंक्रांत व भूगोल दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत
खैरकवाडी ता.मुखेड

