नांदेड, दि. १८ जानेवारी : नांदेड शहरातील मोदी मैदानावर आयोजित “हिंद-दी-चादर” कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू असून, या भव्य कार्यक्रमाचे सूक्ष्म व सुसूत्र नियोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी २६ विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून, या समित्यांमार्फत प्रत्येक लहान-मोठ्या बाबीचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वांच्या समन्वयाने व सहकार्याने सामाजिक व धार्मिक सलोख्याचा हा कार्यक्रम यशस्वी होईल, अशी अपेक्षा अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव रुचेश जयवंशी यांनी व्यक्त केली.
राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग, राज्यस्तरीय समिती तसेच शीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकी, उदासीन, भगत नामदेव (वारकरी संप्रदाय) व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने “हिंद-दी-चादर” कार्यक्रमाचे आयोजन मोदी मैदान, नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज मोदी मैदानावर गठीत समित्यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीस विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, श्री गुरु तेग बहादूर साहिबजी शहीदी समागम राज्य समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, शहीदी समागम समितीचे शासकीय समन्वयक डॉ. जगदीश सकवान, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, लातूर विभागाचे प्र. माहिती उपसंचालक विवेक खडसे, सर्व समित्यांचे नोडल अधिकारी, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक हरजितसिंघ कडेवाले यांच्यासह सर्व शासकीय व अशासकीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रभावी प्रचार-प्रसिद्धीसाठी इन्फ्ल्युएन्सर्सची भूमिका महत्त्वाची – जिल्हाधिकारी
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धीबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्याच्या काळात सोशल माध्यमे ही प्रभावी प्रसिद्धीची साधने ठरत असून, त्यामध्ये इंस्टाग्राम हे अल्प कालावधीत मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचणारे प्रभावी माध्यम आहे. कोणत्याही कार्यक्रमाच्या व्यापक प्रसिद्धीसाठी सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
नांदेड येथे आयोजित “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त होणाऱ्या भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, इंस्टाग्रामसह विविध सोशल माध्यमांचा सकारात्मक व प्रभावी वापर करून हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा. यासाठी स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवरील इन्फ्ल्युएन्सर्सनी पुढे येऊन सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
हा कार्यक्रम केवळ धार्मिक नसून सामाजिक ऐक्य, सेवा आणि बलिदानाचा संदेश देणारा ऐतिहासिक सोहळा असल्याने समाज माध्यमातून त्याचा आशय प्रभावीपणे प्रसारित करणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले.
२६ शासकीय समित्यांच्या कामकाजाचा सखोल आढावा
यावेळी “हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थापन करण्यात आलेल्या एकूण २६ शासकीय समित्यांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या व त्यांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात आला. आवश्यक त्या सूचना देत समन्वय अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला.
याप्रसंगी समन्वयक रामेश्वर नाईक यांनी दिनांक २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथे होणाऱ्या श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत संपूर्ण नियोजनाची माहिती दिली व संबंधित समिती सदस्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
000000#हिंददीचादर
#गुरुतेगबहादूर
#शहीदीसमागम
#350thShaheedi
#GuruTeghBahadurJi
#नांदेड
#ShahidiSamagamMaharashtra DGIPR
विभागीय माहिती कार्यालय, लातूर
DDSahyadri
Doordarshan National (DD1)
Nanded Police
Nanded Police
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
All India Radio News
Hind Di Chadar

