मराठा समाजाच्या दबावाखाली एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा ओबीसी विरोधी निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला. त्याचा निषेध म्हणून ओबीसी समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. मुख्यमंत्र्यांनी काही ओबीसी नेते आणि मंत्री यांची मीटिंग पण घेतली. उपसमिती नेमण्याचा लॉलीपाप नेत्यांच्या हातात दिला.
आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या आमच्या मागणीवर मुख्यमंत्री सकारात्मक आहेत, असे जुनेच गाजर समाजाला दाखवत ओबीसी नेत्यांनी विषय संपवला ! (पण.. ५२ टक्के ओबीसींना मिळणारे हे आरक्षण नेमके किती होते..? तर ६ टक्के, ७ टक्के, ११ टक्के तर कुठे १९ टक्के.. आणि तेवढ्यावर हे महान नेते शेपट्या टाकून खुश झालेत. कारण त्यांना त्यांच्या खुर्च्या वाचवायच्या होत्या )-मुळात १५ दिवसापूर्वीच असे लोटांगण घालणारे ओबीसी नेते आता लगेच गडचिरोली, चंद्रपूर, पालघर सारख्या काही जिल्ह्यात ओबीसींना मिळत असलेले आरक्षण वाढवून द्या,
अशा मागण्या करण्यासाठी अचानक कसे काय जागे झाले असावेत ? एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्या मुळे हजारो विद्यार्थ्यावर अन्याय होऊनही चूप बसणारे नेते असे अचानक आक्रमक का झालेत ?-मित्रांनो, याचा अर्थ नीट समजून घ्या. अचानक त्यांना सद्बुद्धीही झाली नाही किंवा त्यांचा स्वाभिमान देखील जागा झाला नाही. मग नेमकं असं काय घडलं ? कुठला दबाव आला ? कोणती मजबूरी आहे ? हे नेते अचानक पक्षाच्या भूमिकेच्याही विरोधात जात आहेत, असा आभास का निर्माण करत आहेत ?
-मात्र तुम्हा आम्हाला नसेल पण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात एक आगळी वेगळी आणि ऐतिहासिक घटना घडत असल्याचा अंदाज या साऱ्या नेत्यांना, राजकीय पक्षांना आलेला आहे. आपण केलेल्या खालील काही घोषणांचा नेमका अर्थ आणि त्यांचे भविष्यातील परिणाम यांचा नीट विचार करून बघा..-• *ओबीसी जनगणना सत्याग्रह !*• *आमची जनगणना, आम्हीच करणार* !• *आम्ही आमदार, खासदार, कलेक्टर, मंत्री, मुख्यमंत्री अशा कुणालाही निवेदन देणार नाही* !
• *आमच्या जनगणनेला कुणाच्याही मान्यतेची गरज नाही* • *आमचे शेत आम्हीच मोजून घेवू, मजबूत कुंपणही करू.*• *आम्हाला कुणाच्याही शेतावर अतिक्रमण करायचे नाही. पण आमच्या शेतावर कुणाचे अतिक्रमणही होऊ देणार नाही. उलट आधी झालेलं अतिक्रमण काढून फेकायचं आहे.*-आपण *लोकजागर अभियान* तर्फे ही जी भूमिका घेतली आहे, त्याचा हा परिणाम आहे. ओबीसी नावाचा ज्वालामुखी आता जागा होतोय, याची त्यांना कल्पना आल्यामुळे सर्वांच्या मनात धडकी भरली आहे.-मुळात आपलं हे अभियान *गांधी – आंबेडकर यांच्या विचारांचं अफलातून कॉकटेल* आहे..! जाणकारांना त्याचे दूरगामी परिणाम लक्षात यायला लागले आहेत.
म्हणूनच त्यांची धावपळ सुरू झाली आहे. सत्याग्रहाला मिळणारा वाढता प्रतिसाद त्यांच्या लक्षात आलेला आहे.-*सत्याग्रह* या शब्दातून महात्मा गांधी आपल्या सोबत आहेत आणि *आमची जनगणना, आम्हीच करणार..* ह्या निर्धारात बाबासाहेब आंबेडकर यांचा दणका आहे ! *एक व्यक्ती, एक मत* ह्यातला आंबेडकरी दारूगोळा आणि गांधी यांच्या सत्याग्रहामधील माणसं बांधून ठेवणारं सिमेंट आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला महाबली बनविण्याची जादू..म्हणजेच हे कॉकटेल आहे ! या क्रांतिकारी रसायनाचा पहिला आणि ऐतिहासिक प्रयोग आपण १८ ऑक्टोबर २०२० ला रविवारी महाराष्ट्रात करणार आहोत. त्याचं लोण देशात पसरायला वेळ लागणार नाही. ओबीसी – बहुजन मुक्तीच्या लढ्याची ही मुहूर्तमेढ असेल, याची खात्री असू द्या.
उद्याच्या दिवसाची नोंद इतिहासाला घ्यावी लागणार आहे, हे मी नम्रपणे सांगू इच्छितो ! आपण सारे त्या ऐतिहासिक लढाईचे पहिले सत्याग्रही आहोत, याचा अभिमान असू द्या !-आपले हात खाली आहेत. आपले खिसे रिकामे आहेत. सत्ताधाऱ्यांच्या नजरेत आपण त्यांचे हक्काचे गुलाम आहोत. विविध जाती धर्मातील, पक्षातील प्रस्थापित नेतृत्व एका बाजूला आहे आणि आपला सारा विस्थापित समाज दुसऱ्या बाजूला आहे. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, कोणत्याही धर्माचे असा, कोणत्याही जातीचे असा, तुम्ही ब्राम्हण असा की मराठा असा, तेली असा, कुणबी असा की माळी असा, बलुतेदार असा की आणखी कुणीही असा, ओबीसी असा की दलित असा.. या प्रस्थापित नेत्यांच्या लेखी तुम्ही आम्ही केवळ *किड्या – मुंग्यांचे पुंजके आहोत !*
त्या त्या पक्षांचे ओबीसी सेल म्हणजे पक्षांच्या कुक्कुट पालन संस्था आहेत. तितर, बटेर फार्म्स आहेत, गोट फार्म्स आहेत !-मात्र आपण गांधी – आंबेडकरी विचारांचं बडिंग केलेली नवी रोपं तयार करायला सुरुवात केली आहे. उद्या आपण मैदानात उतरून ही रोपं महाराष्ट्राच्या मातीत लावणार आहोत. -पण त्याआधीच त्यांची मुळं ओबीसी, बहुजन, अल्पसंख्यांक समुदायाच्या मनात घट्ट व्हायला लागली आहेत. प्रस्थापितांच्या भिंतीमध्ये झपाट्यानं घुसायला लागली आहेत. आणि त्या हादऱ्या मुळेच हे लोक आता जागे झाले आहेत, हा यामागील गर्भित अर्थ आहे.
असे आणखीही बरेच राजकीय चमत्कार आपल्याला नजीकच्या काळात बघायला मिळणार आहेत. गोळ्या बिस्किटांच्या ऐवजी चॉकलेट, पिझ्झा ओबीसींच्या तोंडासमोर धरला जाणार आहे. मात्र त्यावर हुरळून जाऊ नका. लाळ गाळू नका. फक्त बारकाईने लक्ष ठेवून रहा. हीच आपल्या परीक्षेची घडी असणार आहे. आपण मैदानात उतरलो देखील नाही, तरी ही उलथापालथ बघायला मिळते आहे. यावरून काय ते समजून घ्या. उद्याचा आपला विजय हा ओबीसी समाजाच्या डोळस एकजुटीचा विजय असेल, एवढं मात्र नक्की !-अजूनही जे काठावर बसून गम्मत बघत आहेत, त्या सर्व मित्रांना या प्रसंगी एवढंच सांगतो, दोस्तहो.. हे *गांधी आंबेडकरी विचारांचं कॉकटेल आहे.. जस्ट ट्राय तर करून बघा..! इतिहास बदल जायेगा*!-तूर्तास एवढंच..-
*ज्ञानेश वाकुडकर*अध्यक्ष*
लोकजागर अभियान*