अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणी धरणे आंदोलन करण्याचा इशारा
वणी ;
यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील तीन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याप्रकरणी आणि पंचशील नगर, वणी येथील गोरले भगिनींना खोटे आरोप लावून पोलिसांकडून बेदम मारहाण केल्या प्रकरणी योग्य तपास होत नसल्या कारणाने आणि आरोपीवर कठोर गुन्ह्याची नोंद केल्या गेली नसल्यामुळे काल उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांना सामाजिक कार्यकर्त्यांकडून निवेदन देण्यात आले व चर्चा करण्यात आली, आरोपीवर कठोरात कठोर कार्यवाही झाली नाही दोषी पोलिसांचे निलंबन झाले नाही तर येत्या काळात वणी पोलीस स्टेशन समोर “धरणे आंदोलन” केल्या जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
या प्रकरणी अपहृत तीनही मुली अल्पवयीन असल्याने खऱ्या आरोपीवर बालहक्क कायद्यानुसार कारवाई करावी, आरोपीवर अपहरणाचा गुन्हा दाखल करावा, मुलींना डांबून ठेवून छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, या प्रकरणात गोरले भगिनींना झालेल्या मारहाणीबाबत संबंधितांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, त्यातील जबाबदार पोलिस निरीक्षक, २ पोलिस, २ महिला पोलिस यांच्यावर गुन्हा दाखल करावा, आरोपीचा हेतु वाईट असल्यामुळे त्याचेवर मानवी तस्करीचाही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांना दिलेल्या निवेदनावर अनिल तेलंग, काॅ. अनिल घाटे, अॅड. रुपेश ठाकरे, रफिक शेख, आसीम हुसेन, पुखराज खैरे, सुभाष लवंते, चंद्रमणी दसोडे, गौरव जवादे, कृपाशील तेलंग, प्रलय तेलतुंबडे, चिंतामण वाघाडे, नितेश तुराणकर, शुभम गणवीर, प्रवीण खानझोडे, जे. एम. दाहे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.