महाराष्ट्रातील रस्ते विकास प्रकल्पांसाठी २५०० कोटींपेक्षा अधिकचा निधी मंजूर;

नितीन गडकरी यांनी माहिती

नवी दिल्ली, दि.1 : महाराष्ट्रातील विविध रस्ते विकास प्रकल्पांसाठी आज केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्रालयाकडून 2500 कोटींपेक्षा अधिकचा निधी मंजूर करण्यात आला.

केंद्रीय भूपृष्ठ व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून देशभरातील विविध राज्यातील विकास कामांसाठीच्या निधीला मंजुरी दिल्याचे टि्वट केले. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध राष्ट्रीय महामार्गांच्या कामांसाठी 2500 कोटी रूपयांपेक्षा अधिकचा निधी मंजूर केल्याची माहिती दिली. यामुळे राज्यातील रस्त्यांचे जाळे अधिक बळकट होईल. यामध्ये कोकण ते विदर्भातील दुर्गम भागांचाही समावेश आहे.

या रस्ते विकास प्रकल्पांसाठी निधी मंजूर

परळी ते गंगाखेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 F च्या दर्जोन्नती आणि पुनर्वसनासाठी 224. 44 कोटी रूपयांचा निधी तर आमगाव ते गोंदिया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 543 साठी 239.24 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. 28.2 किलोमीटर असलेल्या तिरोरा ते गोंदिया राज्य महामार्गाचे दर्जोन्नती आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 यासाठी 288.13 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

गडचिरोली जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी वरील 262 किमी ते 321 किमीच्या दरम्यान लहान मोठे 16 पूल बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी 282 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याबाबतही आज ट्विट करून श्री. गडकरी यांनी माहिती दिली.

नांदेड जिल्ह्यातील येसगी गावामध्ये मांजरा नदीवर पूल बांधण्यासाठी 188.69 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. नागपूरमधील आरटीओ चौक ते नागपूर विद्यापीठ परिसर असा उड्डाणपूल बांधण्यासाठी तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील वाडी-एमआयडीसी जंक्शन येथे चार पदरी उड्डाणपूल बांधण्याची परवानगी देण्यात आली. यासाठी 478.83 कोटी रूपयांचा निधीला आज मंजुरी मिळाली.

तारेरे-गगनबावडा-कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 च्या अद्ययावतीकरणासाठी 167 कोटी रूपयांचा तर वातूर ते चारथाना या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 साठी 228 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

गुहागर ते चिपळूण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 ई च्या अद्ययावतीकरणासाठी 171 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. जळगाव-भद्रा-चाळीसगाव-नांदगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 च्या विस्तारीकरणासाठी 252 कोटी रूपयांचा निधी आज मंजूर करण्यात आला आहे.

#NitinGadkari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *