भारत-पाकिस्तान यांच्यातला क्रिकेट सामना म्हणजे जगातील सर्व चाहत्यांसाठी पर्वणीच. टशन, थरार, वाद असा पूर्ण पॅकेज उभय देशांच्या सामन्यातून अनुभवायला मिळतो. पण, दोन्ही देशांमधील राजकीय परिस्थिती पाहता भारत-पाकिस्तान फक्त आयसीसी आणि आशिया चषक स्पर्धेतच एकमेकांविरुद्ध खेळतात. २००७ मध्ये पाकिस्तानचा संघ पाच वन डे व तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता. त्यानंतर २०१२-१३मध्ये भारत दौऱ्यावर पाकिस्तान मर्यादित षटकांची द्विदेशीय मालिका खेळला होता.
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा भारतीय भूमीत क्रिकेटचा थरार रंगण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतात यंदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे आणि त्यासंदर्भात पाकिस्तानच्या सहभागावरून उडालेल्या गोंधळावर आयसीसीनं मोठं पाऊल उचललं आहे. ऑक्टोबर महिन्यात हा वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे आणि यासाठी पाकिस्तानच्या खेळाडू व सपोर्ट स्टाफला व्हिसा मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही बीसीसीआयनं आयसीसीला दिली आहे.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे चेअरमन एहसान मणी यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानी खेळाडू व सपोर्ट स्टाफला व्हिसा मिळण्याची ग्वाही देण्यात यावी अशी विनंती आयसीसीकडे केली होती. ”भारतानं आम्हाला व्हिसाबाबत लेखी आश्वासन द्यावं अन्यथा वर्ल्ड कप भारतातून यूएईत खेळवण्यात यावा,”असे मत मणी यांनी व्यक्त केलं होतं.
इंडियन प्रीमिअर लीग ही जगातली लोकप्रिय ट्वेन्टी-20 लीग स्पर्धा. जगभरातले प्रमुख क्रिकेटपटू या स्पर्धेत खेळण्यासाठी आतूर असतात.
इंडियन प्रीमिअर लीगच्या 2008 मध्ये झालेल्या पहिल्या हंगामात पाकिस्तानचे एक नव्हे तर 11 खेळाडू सहभागी झाले होते. मात्र त्यानंतरच्या कोणत्याही आयपीएलमध्ये एकही पाकिस्तानी खेळाडू सहभागी झालेला नाही. काय आहे यामागचं कारण?
पहिल्यावहिल्या आयपीएलमध्ये पाकिस्तानचं नेतृत्व केलेले युनिस खान, मिसबाह उल हक हे खेळाडू होते. जगातल्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये नोंद होणारे शाहिद आफ्रिदी, मोहम्मद हफीझ आणि शोएब मलिक खेळले होते.
क्रिकेटविश्वात सर्वाधिक वेगाने बॉलिंग करणाऱ्या बॉलर्सच्या यादीत समाविष्ट शोएब अख्तर सहभागी झाला होता. शैलीदार बॅट्समन सलमान बट्ट आणि उंचपुरा उमर गुल त्याचे कोलकाता संघातले सहकारी होते.
राजस्थान रॉयल्सने युनिस खानच्या बरोबरीने कामरान अकमल आणि सोहेल तन्वीर यांच्यावर विश्वास ठेवला. सोहेलने या विश्वासाला सार्थ ठरत परपल कॅप पटकावली होती. आयपीएलमधील सर्वोत्तम बॉलिंग आकडे हा मान सोहेलच्या नावावर अकरा वर्षं होता.
जगभराल्या बॅट्समनची भंबेरी उडवणारा मोहम्मद आसिफ दिल्लीकडून खेळला होता. गेल्या दशकभरात ट्वेन्टी-20 तसंच वनडेत सातत्याने चांगली कामगिरी करणारा मोहम्मद हफीझ कोलकाता संघाचा भाग होता.
राहुल द्रविड, मार्क बाऊचर, जॅक कॅलिस, डेल स्टेन यांच्या बरोबरीने मिसबाह उल हक बेंगळुरू संघाचा भाग होता. थोडक्यात पाकिस्तानचे तत्कालीन सगळे प्रमुख खेळाडू 2008च्या आयपीएल स्पर्धेत विविध संघांकडून खेळले.
मुंबई, चेन्नई आणि पंजाब या संघांनी पाकिस्तानी खेळाडूंना समाविष्ट केलं नाही. आयपीएलचा पसारा वाढत गेला तसं खेळाडूंना मिळणारे पैसे आणि प्रसिद्धीही वाढत गेली. आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याचा फायदा अनेक खेळाडूंना राष्ट्रीय संघात निवडीसाठी झाला.
आंतरराष्ट्रीय खेळाडूबरोबर एकत्र खेळण्याचा मोठा अनुभव मिळाला. 2008 हंगामात पाकिस्तानच्या खेळाडूंची कामगिरी चांगली झाली होती. पण त्यानंतर असं काहीतरी घडलं की ज्याच्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंसाठी आयपीएलची दारं बंद झाली. एक तप उलटून गेलं, आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे पडघम वाजू लागलेत पण पाकिस्तानच्या खेळाडूंसाठी अजूनही आयपीएलची दारं घट्ट बंद आहेत.
त्याच वर्षी म्हणजे 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 34 विदेशी नागरिकांसह एकूण 166 जणांनी जीव गमावला तर आठशेहून अधिक लोक जखमी झाले. या हल्ल्यात दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, मुंबई पोलिसांच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे, पोलीस निरीक्षक विजय साळसकर, एनएसजी कमांडो संदीप उन्नीकृष्णन यांच्यासह एएसआय तुकाराम ओंबळे यांचा मृत्यू झाला.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत तीन दिवस हे थरारनाट्य चाललं. मुंबई पोलीस आणि सुरक्षायंत्रणांनी मिळून 9 दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं. अजमल कसाब हा जिवंत पकडण्यात आलेला एकमेव ठरला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मरण पावलेले सगळे हल्लेखोर पाकिस्तानचे होते. या हल्ल्यामागे लष्कर-ए-तय्यबाचा हात असल्याचं स्पष्ट झालं. कसाब पाकिस्तानचा नागरिक असल्याचं पाकिस्तानने सुरुवातीला मान्य केलं नाही. परंतु भारताने सर्व साक्षीपुरावे पाकिस्तानसह अमेरिकेसमोर ठेवले.
या हल्ल्यानंतर संशयाची सुई पाकिस्तानच्या दिशेने रोखली गेली. पकडण्यात आलेला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबने दहशतवादी हल्ला केल्याची कबुली दिली. 2009 मध्ये या खटल्याची सुनावणी सुरू झाली. कसाबवर 86 आरोप निश्चित करण्यात आले. 3 मे 2010 रोजी विशेष सत्र न्यायालयाने कसाबला फाशीची शिक्षा ठोठावली. 21 फेब्रुवारी 2011 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने कसाबच्या फाशीच्या निर्णय कायम ठेवला.
10 ऑक्टोबर 2011 रोजी सर्वोच्च न्यायालयाने कसाबच्या फाशीवर शिक्कामोर्तब केलं. निष्पक्ष सुनावणी झालं नसल्याचं कसाबने सांगितल्याने सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकली. नरसंहाराचं फुटेज पाहिलं. अडीच महिन्यांच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला.
29 ऑगस्ट 2012 रोजी सर्वोच्च न्यायालयाने कसाबला फाशीची शिक्षा कायम ठेवली. कसाबचा दयेचा अर्ज फेटाळण्यात यावा अशी शिफारस गृह मंत्रालयाने राष्ट्रपतींना केली. 5 नोव्हेंबर 2012 रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कसाबचा दयेचा अर्ज फेटाळला. राष्ट्रपतींच्या निर्णयाची माहिती केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला दिली.
18-19 नोव्हेंबर 2012 रोजी कसाबला कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत मुंबईतल्या ऑर्थर रोड जेलमधून पुण्यातल्या येरवडा जेलमध्ये हलवण्यात आलं. 21 नोव्हेंबर 2012 रोजी येरवडा तुरुंगातच कसाबला फाशी देण्यात आली.
मुंबई हल्ला आणि त्यापुढच्या तपास घटनांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध दुरावलेलेच राहिले. याचा परिणाम दोन्ही देशांदरम्यानच्या क्रिकेटवरही पाहायला झाला.
क्रिकेटविश्वातल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये भारत-पाकिस्तान यांचा समावेश होतो. टीव्हीवर आणि प्रत्यक्षातही प्रेक्षकसंख्येचे नवनवे विक्रम भारत-पाकिस्तान लढतींनी मोडले आहेत. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड या पारंपरिक अशेस द्वंद्वाप्रमाणे भारत-पाकिस्तान म्हणजे दर्जेदार क्रिकेटची पर्वणी हे समीकरण ठरलेलं.
चांगल्या खेळाच्या बरोबरीने खेळाडूंमधली वादावादी, भांडणं, मैत्रीचे किस्से जगजाहीर आहेत. परंतु दोन्ही देशांमधील दुरावलेल्या संबंधांमुळे भारतीय संघ पाकिस्तानमध्ये मालिका खेळण्यासाठी जात नाही आणि पाकिस्तानचा संघ भारतात मालिका खेळण्यासाठी येत नाही. केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये म्हणजेच वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कप या तटस्थ स्पर्धांमध्येच हे दोन संघ आमनेसामने येतात.
भारताने पाकिस्तानमध्ये शेवटची टेस्ट 2006 मध्ये तर शेवटची वनडे 2008 मध्ये खेळली आहे. पाकिस्तानचा संघ भारतात शेवटची टेस्ट 2007 मध्ये खेळला आहे तर पाकिस्तानचा संघ वनडे सीरिजसाठी 2013 मध्ये भारतात आला होता.
पाकिस्तानचे खेळाडू ऑस्ट्रेलियातील बिग बॅश, बांगलादेश प्रीमिअर लीग, कॅरेबियन प्रीमिअर लीग, श्रीलंका प्रीमिअर लीग, मझांशी सुपर लीग, ट्वेन्टी-20 ब्लास्ट असं जगभरातील ट्वेन्टी-20 लीगमध्ये खेळतात परंतु भारतात होणाऱ्या लीगची दारं त्यांच्यासाठी बंद आहेत. आता यावर्षी ते खेळू शकतील का ते पाहू या.
गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय
दि.२/०४/२०२१