पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सूचनांची अंमलबजावणी
अर्धापूर दि 17- अर्धापूर तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मालेगाव येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये कोवीड रुग्णालय सोमवारपासून कार्यान्वीत करण्यात येणार आहे. तर अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात येत्या चार दिवसात कोवीड सेंटरची सुरुवात करण्यात येणार आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या संदर्भात जिल्हा प्रशासनास सूचना केल्या होत्या. या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे.
अर्धापूर तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन अर्धापूर आणि मालेगाव येथे कोवीड केअर सेंटर व रुग्णालयाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांची होती. या मागणीची दखल घेत पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी एका आढावा बैठकीत या दोन्ही ठिकाणी कोवीड केअर सेंटरची स्थापना करण्यात यावी, अशा सूचना केल्या होत्या. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी मालेगाव येथील कोवीड सेंटरच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी रुग्णालयास भेट दिली. व सोमवार दि.19 पासून हे कोवीड सेंटर सुरु होणार असल्याचे यावेळी सांगितले. त्यासोबतच या ट्रामा केअर सेंटरमधील सर्व सेवासुविधांचा जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी आढावा घेतला. या कोवीड सेंटरसाठी आवश्यक असलेला डाॅक्टर व नर्सेसचा स्टाॅफ उपलब्ध करून देण्यात आला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नागरिकांची मागणी लक्षात घेऊन हे कोवीड सेंटर निर्माण केल्याबद्दल पालकमंत्री अशोकराव चव्हाण व जिल्हाधिकारी डाॅ.विपीन इटनकर यांचे मालेगावचे सरपंच अनिल इंगोले, उपसरपंच मोहन खंदारे, ईश्वर पाटील यांच्यासह गावक-यांनी आभार मानले. अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात येत्या चार दिवसात कोवीड सेंटर स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती डाॅ. विपीन इटनकर यांनी दिली.