नांदेड, दि. 24 :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि उपलब्ध असलेले कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर लक्षात घेवून पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मनपाअतंर्गत जम्बो कोविड रुग्णालय उपलब्ध करुन दिले. जिल्हा प्रशासनाने या रुग्णालयाचे काम युध्द पातळीवर अवघ्या काही दिवसातच पूर्ण करुन ते पाच दिवसापूर्वी कार्यान्वित झाले. आज या जम्बो कोविड हेल्थ केअर सेंटरमधून अवघ्या पाच दिवसाच्या उपचारानंतरच तब्बल सात कोविड बाधित साध्या मल्टिविटॅमिन आणि ॲन्टिबायोटिकच्या औषधांवर बरे होवून सुखरुप घरी परतले.
येथील आरोग्याची काळजी घेणाऱ्या संपूर्ण मेडिकल स्टाफचे कौतुक करुन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी बरे झालेल्या महेश भगत या बाधिताला प्रातिनिधिक स्वरूपात गुलाब पुष्प देवून शुभेच्छा दिल्या. अवघ्या पाच दिवसात बरे होवून घरी गेलेल्या सातही बाधितांचे सुरुवातीचे ऑक्सिजन लेवल 80 ते 85 एवढे होते. त्यांना दहा लिटर, आठ लिटर, सात लिटर असे ऑक्सिजन कमी – कमी करत साध्या ॲन्टिबायोटिक औषधांवर व्यवस्थित केले. यातील एकाही बाधिताला रेमडेसिव्हिर इंजेक्शन द्यावे लागले नाही व त्यांनीही तसा आग्रह धरला नाही हे विशेष. याचबरोबर या सेंटर आणि इथल्या मेडिकल स्टाफचे हे वैशिष्ट्य मानावे लागेल. सदर सात व्यक्तींना घरीच आता उर्वरित 14 दिवसापर्यंत विलगीकरणात राहण्याचा सल्ला आरोग्य विभाग व त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिला आहे.
भक्ती लॉन्स येथे नव्याने उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड हेल्थ केअर सेंटर येथे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्यक्ष दोन वेळेस भेट देवून अधिकाधिक उपचाराच्या चांगल्या सुविधा कशा देता येतील याची स्वत: पाहणी करुन मार्गदर्शन केले होते. प्राथमिक टप्प्यात या ठिकाणी 70 बेड्स हे ऑक्सिजन सुविधेसह परिपूर्ण तयार झाले असून संपूर्ण क्षमतेने हे सेंटर सुरु आहे. उर्वरित बेड्स व ऑक्सिजन लाईनचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी दिली.